पिंपरी – गणेश मंडळांना लागणारा परवाना विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी होणार उपलब्ध होईल तसेच या वर्षापासून मोरया पुरस्काराने गणेश मंडळांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील गणेशोत्सव मंडळे, पोलीस प्रशासन, वीज वितरण, महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक ग दि माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, प्रभारी शहर अभियंता ज्ञानदेव झुंजारे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त मिनिनाथ दंडवते, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह मंडळांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त चौबे म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना लागणारा परवाना हा विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा सुट्टीच्या दिवशीही सुरू असणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पोलीस प्रशासन, महापालिका तसेच इतर यंत्रणांनी निश्चित केलेल्या अटी शर्तींचे पालन करणे मंडळांना बंधनकारक आहे.
अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकींचे मार्ग, विसर्जन घाट सुव्यवस्थित करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे विसर्जन घाटांची पाहणी करून निश्चित करण्यात येणार असून विसर्जन घाटांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
शहरातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यांची डागडुजी तसेच कृत्रिम तलावांच्या आणि विसर्जन घाटांच्या साफसफाईबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कलशामध्येच टाकावे, गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदातच करावे आणि पीओपी ऐवजी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. सूत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी तर आभार पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मानले.
साऊंड सिस्टीमचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या
गणेश मंडळांनी साऊंड सिस्टीम लावताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतरांचा विचार करावा. साऊंड सिस्टीमच्या आवाजाने कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, असे निर्देशही पोलीस आयुक्त चौबे यांनी यावेळी दिले.