आयत्यावेळी जागा बदलल्याने व्यवसाय झालाच नाही
डिपॉझिट, वाहतूक, वीज, स्वच्छता खर्च मातीमोल
पुणे – करोनाच्या संकटाने मूर्तीकारांना आधीच हतबल केले. त्यात महापालिका प्रशासनाने स्टॉलची जागा बदलली. लोकांपर्यंत त्याची माहितीच पोहोचली नाही आणि ग्राहकांनी अक्षरश: त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे हजारो रुपये डिपॉझिट, वाहतूक भाडे, वीज, स्वच्छता खर्च करूनही विक्रेत्यांना 95 टक्के मूर्ती घरी न्याव्या लागल्याचे दिसून आले.
करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा रस्त्याकडेला अथवा फूटपाथवर मूर्ती विक्रीला परवानगी दिली नव्हती. अनेक विनापरवाना स्टॉल्सवर महापालिकेने कारवाईही केली. रस्त्यांवर परवानगी देण्यापेक्षा 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शाळा, मैदाने अशा 41 ठिकाणी स्टॉल्सला परवानगी दिली होती. यासाठी 10 हजार रुपये डिपॉझिट, रोज 900 रुपये भाडे, 1 हजार रुपये स्वछता खर्च आकारला होता. विजेचा खर्च मात्र स्टॉलधारकाला करायचा होता.
वर्षानुवर्षे शनिवारवाडा परिसर आणि श्रमिक भवनसमोरील रस्त्यावर 3 दिवस स्टॉल्ससाठी परवानगी दिली जाते. परंतु त्यांना यंदा स्वारगेट येथील गणेश कला मंच येथे 100 स्टॉल्स साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. या जागेबाबत मूर्तीकार सुरूवातीपासूनच नाराज होते. परंतु प्रशासनाला सहकार्य म्हणून केवळ दोनच दिवस आधी म्हणजे 20 ऑगस्ट रोजी येथे स्टॉल्स सुरू केले. सुमारे 100 स्टॉलसवर 18 हजारांहून अधिक मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
मात्र, अगदी पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी पाठ फिरवली. जे ग्राहक यायचे ते मूर्तीचा भाव पाडून मागायचे. फारतर छोट्या मूर्ती घ्यायचे. यापैकी काही स्टॉल्सवर तर गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री अगदी नऊ वाजेपर्यंत एकही मूर्तीची विक्री झाली नाही. तर काही स्टॉल्सवर सकाळी एक मूर्ती विकली गेली होती.
विक्रेत्यांचे चेहेरे अक्षरशः रडवेले झाले होते. तर महिला विक्रेत्यांनी अश्रूंना वाट करून दिली. यावर आता पालिका प्रशासन काय उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
काय करावे सूचत नाही…
“आम्ही अप्पर इंदिरानगर येथे राहतो. वर्षभर आमचे 4 -5 माणसांचे कुटुंब मूर्ती कामासाठी राबते. गणेश चतुर्थी संपायची वेळ आली, मात्र तीन दिवसांत बोहनीही झाली नाही. आम्ही अनेकवर्षे शनिवार वाडा येथे स्टॉल लावतो. यंदा याठिकाणी 2 स्टॉल्सवर 250 मूर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या. तीन दिवसांत फक्त 40 छोट्या मूर्ती विकल्या गेल्या. भाडे, वाहतूक आणि इतर 30 ते 35 हजार खर्च झाला आहे. काय करावे सूचत नाही,’ अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांनी हतबल होऊन दिल्या.