वडगाव मावळ, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वडगाव मावळ येथे नागरिकांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन गांधीगिरी पद्धतीने गुलाब पुष्प व निदेनाची प्रत देत दिले.
शाखा अभियंता मनोज नेमाडे व कनिष्ठ अभियंता राहुल लकडे यास वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आसल्याबबत निवेदन दिले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव पंकज भामरे, वडगाव शहर राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष सौरभ सावले, शैलेश खैरे, अभिषेक ढोरे उपस्थित होते.
या वेळी वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, मल्हार रेसिडेन्सी, एकविरानगर कॉलनी, लक्ष्मी नगर कॉलनी व परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्यार्थी, कामगार, महिलांना या समस्येला रोजच तोंड द्यावे लागत आहे.
या कार्यक्षेत्रात रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल, तालुका कृषी कार्यालय आहे. तसेच अनेकजण घरूनच वर्क फ्रॉम होम करत आहेत. इतर छोटे, मोठे व्यावसायिक या परिसरात असून सकाळच्या विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा त्यांना त्रास होतो. त्यामुळे लवकर कारवाई करावी. तसेच वडगाव मावळ स्मशानभूमीतील डीपी बॉक्स नादुरुस्त असून तो बदलावा.
अनेक ठिकाणी खांबावरील तारांना झोळ निर्माण झाल्यामुळे वारंवार फ्यूज जात आहे. वडगाव स्मशानभूमी जवळील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी. उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्म गरम होऊन त्यातून ऑइल बाहेर येण्याची शक्यता असते. त्याला ट्रान्सफॉर्मर कव्हर बसून घ्यावेत, आशी मागणी या निवेदनात करण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.