तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुका व पंचक्रोशीतील गरजू व गोरगरिबांच्या मुला मुलींचे विविह चांगल्या पद्धतीने व संसारपयोगी वस्तू देऊन सामुदायिक विवाह थाटामाटात होईल, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व आमदार सुनील शंकरराव शेळके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचे तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात आमदार सुनील शेळके, अध्यक्ष सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष, प्रकल्प प्रमुख विलास काळोखे व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या वेळी आमदार सुनील शेळके बोलत होते. उद्घाटनाच्या मुहूर्तावर रोटरी सिटीचे सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी रोटरी पदाधिकारी व आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ३ वधू-वरांची विवाह नोंदणी केली.
अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष किरण ओसवाल, सेक्रेटरी भगवान शिंदे, सदस्य दिलीप पारेख, हरिश्चंद्र गडसिंग, संजय मेहता, सुरेश धोत्रे, संतोष शेळके, दादासाहेब उरे, संजय वाघमारे, संतोष परदेशी, संजय चव्हाण, विश्वास कदम, प्रदीप टेकवडे, रघुनाथ कश्यप, तानाजी मराठे, प्रशांत ताये, राकेश ओसवाल, रामनाथ कलावडे, सुनंदा वाघमारे, बाळासाहेब रिकामे, डॉ. सौरभ मेहता, बसप्पा भंडारी, प्रसाद बानगुडे, मनोज नायडू उपस्थित होते.
हा विवाह सोहळा थोर समाजसेवक भेगडे पाटील या शाळेच्या मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात मोफत लग्न लावली जाणार, भव्य लग्न मंडप, भव्य मिरवणूक, नाश्ता व स्नेहभोजनाची व्यवस्था, मांडव टहाळा, साखरपुडा, हळदी व लग्नाचे पोशाख, झाल झेंडा, गॅस शेगडी, शिलाई मशीन, सिलिंग फॅन, भिंतीवरील घड्याळ, कपाट, प्रत्येक वधूस सोन्याची नथ, तीन भाग्यवान विजेत्या वधूवरांना मोबाइल, भाग्यवान वधूवरास एक गीर गाई व वासरू इत्यादी वस्तू देण्यात येणार आहे.