राजापुरीत गावमोड्यातून साकारला अंतर्गत रस्ता

आदर्शवत उपक्रमाचे होतंय कौतुक

ठोसेघर – परळी खोऱ्यातील सज्जनगड परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले राजापुरी हे एक टुमदार गाव आहे. याच गावातील ग्रामस्थांनी आजही ग्रामीण भागात जुन्या ग्रामीण रूढी आणि परंपरा आजही जिवंत असल्याचे मूर्तीमंत उदाहरण दत्त दिगंबर सेवा मंडळाच्या उपक्रमाने सिध्द केले आहे. दत्त दिगंबर सेवा मंडळाच्या माध्यमातून राजापुरीतील ग्रामस्थांनी जुन्या गावमोडा या रितीनुसार गावातील जवळपास दीड किलोमीटर अंतर्गत रस्ता लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून तयार केला आहे.

राजापुरी गावातील ग्रामस्थांना शेतीसाठी आणि शेजारील वावदरे गावाकडील ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून पाणंद रस्त्याचा वापर करावा लागत होता. तर याच परिसरात गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाचे मंदिर आहे. त्यामुळे या रस्त्यावरून गावकऱ्यांना दररोज पायी प्रवास करावा लागतो. परंतु, या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती.
पावसाळ्यात याच परिसरात गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती आणि ग्रामदैवताचे मंदिर असल्यामुळे गावातील ग्रामस्थांना आणि वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक बनले होते. त्यामुळे हा रस्ता गावमोडा पद्धतीने म्हणजेच लोकसहभागातून तयार करण्याचा संकल्प दत्त दिगंबर सेवा मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला त्याचा या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत राजापुरीतील ग्रामस्थांनी श्रमदान आणि लोकवर्गणीतून हा जवळपास दीड किलोमीटर अंतराचा रस्ता गावमोडा पद्धतीने पूर्ण केला आहे.

याआधीही दत्त दिगंबर सेवा मंडळाच्या माध्यमातून राजापुरीतील स्मशानभूमीची प्रश्‍न राजापुरी ग्रामस्थांनी लोक सहभागातूनच सोडवला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि शासकीय स्तरावर प्रयत्न करून देखील एखादे काम मार्गी लागत नसेल तर ग्रामस्थांनी कशा प्रकारे एकजुटीने आपले प्रश्‍न सोडवावे यांचे एक आर्दशवत उदाहरण राजापुरी गावातील दत्त दिगंबर सेवा मंडळाच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांनी समाजापुढे ठेवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.