नवी दिल्ली – येथे सुरू असलेल्या जी 20 परिषदेची संधी साधून उपस्थित देश भारताव्यतिरीक्त अन्य देशांबरोबर महत्वाची बोलणी करीत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी नवी दिल्लीत सिंगापुरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्याशी सिंगापूरसोबतच्या नवीन धोरणात्मक भागीदारीवर करार केला आहे.
यानुसार ब्रिटन आणि सिंगापुर हे दोन्ही देश आपसातील गुंतवणुकीचे प्रकल्प वेगवान पद्धतीने मार्गी लावू शकणार आहेत. ब्रेक्झिटनंतर प्रथमच ब्रिटनने सिंगापुरबरोबर या संबंधात वाटाघाटी केल्या. या करारामुळे सिंगापूरच्या कंपन्यांना यूकेमध्ये गुंतवणूक करण्याचा अधिक आत्मविश्वास मिळेल आणि ब्रिटनच्या कंपन्यांनाही सिंगापुरमध्ये वाव मिळेल. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीत वाढ अपेक्षित आहे.
सिंगापूरसोबतचा हा नवा करार आम्हाला आमचे प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात मदतगार ठरेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्याचा नकाशा बनवताना आम्हाला हा करार उपयोगी ठरेल असे सुनक यांनी दिल्लीतून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान या नात्याने मी ब्रिटीश लोकांचे हित हे माझ्या आंतरराष्ट्रीय व्यस्ततेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. भारताबरोबर मुक्त व्यापार करार करण्यातही युकेला स्वारस्य आहे आणि या संबंधात चर्चेच्या बारा फेऱ्या झाल्या आहेत.
अधिकृत माहितीनुसार, यूके-सिंगापूर व्यापार उलाढाल 21 अब्ज पौंडांची आहे, जी दक्षिणपूर्व आशियातील ब्रिटनच्या एकूण व्यापाराच्या 40 टक्के इतकी आहे. आणि सिंगापूरच्या संस्थांनी यूकेमध्ये एकूण 226 अब्ज पौंडांची गुंतवणूक केली आहे.