नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याबाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. या दृष्टिकोनाद्वारे भारत – मलेशियादरम्यानचे संबंध महत्वाकांक्षी उंचीवर नेले जाऊ शकतील, असेही ते म्हणाले.
तीन देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात ते मलेशियामध्ये आले आहेत. या दौऱ्यादरम्यान पहिल्यांदा ते सिंगापूर आणि फिलिपाईन्सला गेले होते.
भारताबरोबर पारंपारिक आणि नव्या युगातील संबंधांच्या मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या दृष्टिकोनाचे जयशंकर यांनी कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रादेशिक विकासाबाबतच्या अंतदृष्टिकोनाचा भारताला नेहमीच फायदा झाला असल्याचेही जयशंकर म्हणाले.
याभेटीपूर्वी जयशंकर यांनी मलेशियाचे परराष्ट्र मंत्री मोहमद बिन हाजी हसन यांचीही भेट घेतली. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सकारात्मक आणि मुक्त वातावरणामध्ये चर्चा झाली. मलेशिया-भारत द्विपक्षीय व्यवहार तसेच परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण देखील यावेळी झाली, असे मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
राजकीय, आर्थिक, संरक्षण, डिजीटल, स्टार्टअप, वाणिज्य विषयक आणि जनतेच्या थेट संपर्काशी संबंधित मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. प्रादेशिक, हिंद-प्रशांत क्षेत्र, पश्चिम आशिया आणि युक्रेनच्या मुद्यावरही चर्चा झाली, असे जयशंकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक भागीदारीला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे संबंध अधिक दृढ करण्यावर अधिक भर दिला जाईल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. दोन्ही मंत्र्यांनी उच्चस्तरीय भेटींची देवाणघेवाण, मलेशिया आणि भारताची सातवी संयुक्त आयोगाची बैठक परस्पर सहमतीच्या तारखेला बोलावण्याबाबतही चर्चा केली. जयशंकर डिजीटल मंत्री गोविंद सिंग देव यांचीही भेट घेणार आहेत.
फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्वाला जयशंकर यांचा पाठिंबा
जयशंकर यांनी मंगळवारी फिलिपाईन्सचे अध्यक्ष बोंगबोंग मार्कोस आणि परराष्ट्र मंत्री एन्रीक मनालो यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्वाबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजांनी फिलिपाईन्सच्या जहाजांवर पाण्याचे फवारे मारून पिटाळून लावले होत. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या जहाजांकडून नेहमीच अन्य देशांच्या जहाजांना आक्षेप घेतला जात असतो. चीनच्या या विस्तारवादी भूमिकेला फिलिपाईन्सबरोबर अन्य काही देशांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे फिलिपाईन्सच्या या सार्वभौमत्वाच्या भूमिकेलाआपला पाठिंबा आहे. आसियान देशांच्या विकास आणि समद्धीला भारताचा पाठिंबाच असेल, असेही जयशंकर म्हणाले.