शनिशिंगणापूर– क्षेत्र शनि शिंगणापूर येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या शनिवारी लाखो भाविकांनी स्वयंभू शनिदेवाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात पहाटेच्या आरतीनंतर पहाटे 5 ते 7 या वेळेत शनिमूर्तीला स्नान करण्याची मुभा असते. आज श्रावणातील शेवटच्या चौथ्या शनिवारी हजारो भाविकांनी जलाभिषेक करून आणि तेलाचा अभिषेक करून दर्शन घेतले. दर्शन रांगेत स्नानासाठी देवस्थानच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्रावण महिन्याचा शेवटचा शनिवार असल्याने शनिदेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी जय बजरंग बली आणि जय भगवान शनैश्वराच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भक्तांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी राजकीय, धार्मिक, सामाजिक, शासकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी शनी महाराजांचे दर्शन घेतले. शिंगणापूर पोलीस कर्मचारी व मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.अनेक भाविक प्रसाद वाटून नवस पूर्ण करताना दिसत होते. देवस्थानच्या वतीने या मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत केले. यावेळी नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त पोपटराव शेटे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.