पॅरिस- फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी झालेली चर्चा फलदायी झाली आणि द्विपक्षीय संरक्षण सहभागाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले. मंगळवारी रात्री पॅरिसमधील फ्रेंच सशस्त्र दलाच्या मंत्रालयाचे मुख्यालय हॉटेल डी ब्रायन येथे सिंग यांना सैन्याने “गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
दरम्यान, त्यांनी फ्रान्सकडून भारतीय हवाई दलासाठीच्या पहिल्या राफेल लढाऊ विमानाचा स्वीकार केला. पॅरिसमधील वार्षिक संरक्षण चर्चेच्या वेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री, फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी फलदायी चर्चा झाली, असे सिंग यांनी या बैठकीनंतर बुधवारी ट्विट केले.
दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा हा भारत-फ्रान्सच्या संरक्षण भागीदारीतील एक नवीन मैलाचा दगड आहे आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्यात खरोखरच नवीन उंची प्राप्त झाली आहे, असे नवीन राफेल विमानावरील ‘शस्त्र पूजा’ करण्यापूर्वी राजनाथ सिंह म्हणाले. पूूजा केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी विमानातून एक हवाई चक्करही मारली.
राजनाथ सिंह तीन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत, फ्रान्सच्या “सफरन’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या दौरा करतील. “सफरन’ कंपनीकडून राफेल लढाऊ विमानांसाठी इंजिन तयार केले जाते. ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाबद्दल फ्रेंच व्यवसायिक आणि उद्योजकांबरोबरच्या बैठकीने त्यांच्या दौर्याची सांगता होईल.
पहिल्या राफेल विमानाच्या हस्तांतरणानिमित्त बोर्डेक्स शहरातील मेरिनाक विमानतळावर आयोजित भव्य सादरीकरणासाठी राजनाथ सिंह रवाना झाले, ही सर्व विमाने मे 2022 च्या सुमारास भारतात देण्यात येणार आहेत. ही विमाने आक्रमणासाठी नसून आत्मसंरक्षणासाठी वापरली जाणे अपेक्षित आहे. या विमानांमधील पहिली 18 विमाने फेब्रुवारी 2021 पर्यंत आणि उर्वरित विमाने एप्रिल-मे 2022 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
ही विमाने पंजाबमधील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हसीमारा येथे तैनात केली जाणार आहेत. असे राजनाथ सिंह यांच्या समवेत फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले वायुसेनेचे उपप्रमुख एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांनी सांगितले.