पुसेगाव, (प्रतिनिधी) – पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर 2021 मध्ये मजुराचा खून केल्यानंतर, त्याचा मृतदेह येरळा नदीपात्रात गाडून फरारी झालेल्या मेवालाल जवाहर चौहान या फरारी संशयिताला पुसेगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखने बिहारमधील शिवान जिल्ह्यातून अटक केली आहे.
गवंडीकाम करणार्या राजू चंद्रबली पटेल (वय 32, मूळ रा. चंद्रबली, सिरजमदेई, देवारिया, उत्तर प्रदेश) याचा कंत्राटदार मेवालाल चौहान आणि साथीदारांनी पैशाच्या वादातून डिसेंबर 2021 मध्ये खून केला होता. त्याचा मृतदेह येरळा नदीपात्रात गाडून, संशयितांनी पलायन केले होते.
याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 201, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन संशयितांना पकडण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले होते. मात्र, मुख्य सूत्रधार व इतर संशयित सापडत नव्हते. पोलीस पथके गेल्या दोन वर्षांपासून परराज्यात जाऊन संशयितांचा शोध घेत होते.
पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे दोन वर्षांपासून केलेल्या तपासाला अखेर यश आहे. मुख्य सूत्रधार मेवालाल चौहान (रा. बिहार) हा त्या राज्यातील शिवान जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुसेगाव पोलिसांनी शिवान जिल्ह्यातील संबंधित ठिकाणी सापळा रचून, संशयित मेवालाल चौहानला शिताफीने पकडले. सपोनि संदीप शितोळे व आशिष कांबळे तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, कोरेगावाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष कांबळे, कोयनानगर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शितोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार लैलेश फडतरे, पोलीस नाईक सुनील अब्दागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, अविनाश घाडगे यांनी ही कारवाई केली.