पुसेगाव, (प्रतिनिधी)- अध्यात्मिक व वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या लोणी (ता. खटाव) येथे लोकवर्गणी व देणगीतून कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुसज्ज श्री हनुमान, श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता.२१) आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अंभेरी (ता. खटाव) येथील कार्तिकस्वामी (देवदरी) आश्रमाचे मठाधिपती परशुराम वाघ महाराज यांच्या हस्ते व वरुड (ता. खटाव) येथील पुरोहित बाळासाहेब जोशी यांच्या मंगलमय मंत्रघोषांनी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करत कलशारोहण सोहळा होणार आहे.
शनिवारी सायंकाळी मूर्ती व कलश यांची गावातून हरिनामाच्या गजरात वारकरी सांप्रदायातील बालवैष्णवासह शोभायात्रा व मूर्ती मिरवणूक होणार आहे. रात्री महाप्रसाद झाल्यानंतर कोयना विभाग वारकरी महामंडळाचे हभप बाळकृष्ण महाराज शिंदे यांचे सुश्राव्य कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (ता. २१) सकाळपासून धार्मिक विधी, पुण्याहवाचन, मातृका पूजन, अधिष्ठान देवता पूजन, अग्निस्थापना, मूर्ती व कलशास सर्व औषधी स्नान, पंचामृत स्नान, दशस्नान, जलाधिवास व मूर्तीस निद्रा देवतेचे हवन, देवता उत्थान बलिपूजन पूर्णर्णाहूती आदी विधी होणार आहेत.
शिवाय लोणी गावच्या माहेरवाशिणींचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान मंदिर जीर्णोध्दार, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, सर्व तरुण मित्र मंडळ, लोणी व वाघनगर ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.