खंडाळा, (प्रतिनिधी) – शिरवळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सोमनाथ जयसिंग भोसले (वय 24, रा. जवळे, ता. खंडाळा) याला संपूर्ण सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती व पुरंदर या तालुक्यांमधून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणार्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व पोलीस उपअधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे केलेल्या सोमनाथ भोसले याला सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती व पुरंदर या तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे.
या कारवाईचा प्रस्ताव शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. व्ही. जगताप यांनी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्याकडे दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेऊन, जाधव यांनी सोमनाथ भोसले याच्या तडीपारीचा आदेश पारीत केला.
गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतमुक्त वातावरण राहावे, याकरिता शिरवळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई सुरू आहे. यापुढेही सार्वजनिक शांतता भंग करणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी सांगितले.