राज्य सरकारच्या संकेतस्थळावर बाधित व मृतांची संख्या लपविण्याचा प्रकार
एक हजाराहून अधिक रुग्ण आणि 26 मृत्यू लपविले
पिंपरी – करोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत लपवाछपवीचा खेळ पालिकेपासून ते थेट राज्य सरकारपर्यंत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकार आपल्या संकेतस्थळावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शहर आणि जिल्ह्याची आकडेवारी देत असते.
या यादीत सरकारकडून आकडेवारी लपविण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर गेल्या दोन दिवसांचे आकडे पाहिल्यास स्थानिक पातळीवरील आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल एक हजाराहून अधिक रुग्ण आणि एकूण 26 करानोबाधितांचा मृत्यू लपविल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार 5 जुलै रोजी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 176 बाधित रुग्ण सापडल्याचे दाखवले आहे. तसेच शहराची एकूण करोनाबाधित आकडेवारी 3531 इतकी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यादिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रेसनोटमध्ये तब्बल 321 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले होते. तसेच एकूण रुग्णसंख्या 4288 इतकी झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात दिले होते. महापालिकांच्या वतीने सायंकाळी पाच वाजेपर्यंत विभागीय आयुक्तांकडे रुग्णसंख्येची माहिती दिली जाते. त्यानंतर तीच माहिती महापालिका प्रसिद्धीपत्रकामधून प्रसिद्ध करते. असे असताना रुग्णसंख्येमध्ये एवढा फरक येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरात 3 जुलै रोजी 232 रुग्ण आढळले होते. तर एकूण रुग्णसंख्या 3776 इतकी होती. 4 जुलै रोजी 191 नवीन रुग्णांसह एकूण संख्या 3967 इतकी झाली होती. 2 जुलै रोजीच शहरातील एकूण रुग्णसंख्या 3544 इतकी झाली होती. मात्र तीन दिवसांनंतरही म्हणजेच 5 जुलैला सरकारने 3551 इतकीच रुग्णसंख्या दाखविली आहे. तर 6 जलै या दिवशी शहरात तब्बल 573 इतकी रुग्णसंख्या इतकी वाढली. मात्र सरकारने त्यादिवशीची फक्त 257 रुग्णसंख्या दाखवली. म्हणजेच चार दिवसांत 1317 ने रुग्णसंख्या वाढली. मात्र सरकारने चार दिवसांत फक्त 257 रुग्ण वाढल्याचे दाखवले. जे की इकडे शहरात करोनाने हाहाकार उडालेला आहे. परंतु राज्य सरकारकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या माहितीत आकड्यांचा खेळ सुरू आहे.
मृतांच्या आकडेवारीतही घोळ
पिंपरी चिंचवड शहरात 5 जुलै रोजी एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 93 होती. मात्र राज्य सरकारने एकूण 71 मृत्यू दाखवले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील 61 तर शहराबाहेरील 32 जणांचा समावेश आहे. म्हणजेच सरकारने तब्बल 22 रुग्णांचे मृत्यू लपविले आहे. 3 जुलै रोजीच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 85 इतकी होती. तर दोन दिवसांनी सरकारने 71 मृतांची संख्या कशी दिली याबाबत प्रश्नचिन्ह आहे. राज्य सरकारने 6 जुलैच्या प्रसिद्धीपत्रकात पिंपरी-चिंचवडमधील एकूण 73 रुग्णांचा मृत्यू दर्शविला. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने 6 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शहरातील 67 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 32 अशा एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते. अर्थात 6 जुलै रोजी देखील राज्य सरकारने 26 मृत्यू लपविले .