दबावासाठी माथाडी कामगारांचे उपोषण

कोल्ड स्टोरेजच्या मालकाचा आरोप

वाई – येथील एमआयडीसीमधील कोल्ड स्टोरेजमधील मालाची चढउतार करण्यासाठी आमच्या हमालांचाच वापर करावा, अशी दमदाटी करत माथाडी संघटनेच्या नावाखाली काम थांबवल्याने मालाचे नुकसान तर झाले आहेच शिवाय दबाव तंत्र वापरत बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असल्याचा आरोप संबंधित कोल्ड स्टोरेजच्या मालकाने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दहा कामगारांच्या विरोधात वाई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोल्ड स्टोरेजमध्ये दि. 5 मार्च रोजी ग्रीन पीस व बटर आदी माल तेथील कामगारांमार्फत पिकअप गाडीत भरण्याचे काम सुरू असताना दहाजणांनी तेथे येऊन माल हमालांशिवाय भरायचा नाही, असे सांगत मालक पी. डी. शहा व कामगारांना दमदाटी करून काम बंद पाडले, अशी फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे. याबाबत शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या कामगारांनी काम बंद पाडले व उपोषण सुरू केले आहे, ते आमच्या कंपनीचे कामगार नाहीत. ज्या-ज्या वेळेस या माथाडी कामगारांकडून काम करून घेतले आहे, त्याचवेळी त्यांचा मोबदला दिलेला आहे. त्यांचा कोल्ड स्टोरेजच्या कंपनीशी कसलाही संबंध नसताना चार महिन्यांचा पगार बाकी असल्याचा कांगावा केला जात आहे. एमआयडीसीमध्ये दहशतीचे वातावरण पसरवल्याने अनेक कंपनीत या कामगारांना काम मिळणे बंद झाले आहे. तसेच कोल्ड स्टोरेजच्या कंपनीमधील रजिस्टरमध्ये जबरदस्तीने कामगारांची नावे घुसवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

स्थानिक महिला व पुरुषांना कामासाठी प्राधान्य देत अनेक लहानमोठे उद्योग वाई एमआयडीसीत कार्यरत आहेत. अनेकांचे संसार त्यावर अवलंबून आहेत. मात्र काही अपप्रवृत्तींमुळे मालक आणि कामगार यांच्यातील सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. माथाडी संघटनेच्या नावाखाली मालकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याने उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. आमच्याच हमालांना काम दिले पाहिजे, अन्यथा उपोषण करून कंपनी बंद पाडू अशी भीती वारंवार घातली जात आहे. त्यामुळे उद्योग स्थलांतरित झाल्यास अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. काही अपप्रवृत्तींमुळे कष्टाळू व प्रामाणिक स्थानिक भूमिपुत्र रोजगारापासून वंचित राहणार आहेत. अशा प्रवृत्तींना पायबंद घालून एमआयडीसीतील उद्योगधंद्यांना संरक्षण द्यावे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.