पुणे विद्यापीठांची गुणवत्ता चांगली, पण…

गुण कमी : जनदृष्टिकोनात सुधार होणे गरजेचे


“एनआयआरएफ’च्या अहवालातील निष्कर्ष

पुणे – देशातील पहिल्या शंभरमध्ये पुण्यातील चार विद्यापीठांनी स्थान प्राप्त केले. मात्र, सर्वसामान्य नागरिक आणि तज्ज्ञांचा विद्यापीठाशी असणारा समज, दृष्टिकोन या वर्गवारीत चारही विद्यापीठांना फारच गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणवत्तेत प्रगतीवर असलेल्या चारही विद्यापीठांना जनदृष्टिकोनात (पर्सेप्शन) बरीच सुधारण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या संस्थेने देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-10, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ-46, सिम्बायोसिस विद्यापीठ-56, तर भारती विद्यापीठाने 62 वे पटकाविले आहे. ते स्वागतार्ह आहे. मात्र, या विद्यापीठांशी लोकांच्या दृष्टिकोनात कमी गुण मिळणे, ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. “एनआयआरएफ’ने अध्यापन क्षमता, संशोधकीय उत्पादकता व परिणाम, विद्यार्थ्यांना मिळालेले रोजगार (ग्रॅज्युऐशन आऊटकम), सर्वसमावेशकता व लोकांचा दृष्टिकोन या निकषांच्या आधारे रॅंकिंग निश्‍चित केले जाते. तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, संस्थांचे प्रमुख, कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व माजी विद्यार्थी आदींचा सर्व्हे करून विद्यापीठांविषयीचे मत जाणून घेतले जाते. या सर्व्हेमध्ये पुण्यातील पारंपरिक विद्यापीठ म्हणून पुणे विद्यापीठ, तर तीन अभिमत विद्यापीठ अशा चारही विद्यापीठाला खूपच कमी गुण मिळाले आहेत. त्यावर विचारमंथन होणे आवश्‍यक बनले आहे.

जनदृष्टिकोनात “आयसर’ सर्वात पुढे
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍन्ड रिसर्च अर्थात “आयसर’ या इन्स्टिट्यूटने सर्वसाधारण गटातून देशात 23 वे स्थान मिळविले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आयसर’ने जनदृष्टिकोन गटात 32.75 गुण मिळविले आहेत. संशोधनात अग्रेसर असलेल्या “आयसर’ने पुण्यातील चारही विद्यापीठांच्या तुलनेत चांगले गुण प्राप्त केले आहेत, याकडे शिक्षणतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.