पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट, भटकी व बेवारस श्वानांची संतती नियमन (नसबंदी) शस्त्रक्रिया करण्याच्या नावाखाली आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली आहे. तरी देखील पशुवैद्यकीय विभागाला श्वान संतती रोखता आलेली नाही. आता पुन्हा नव्याने श्वानसंतती नियमन शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील एका खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. संस्थेला बारा महिन्याच्या कालावधीसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यास महापालिकेने सहमती दर्शविली असून सदर संस्था मोफत शस्त्रक्रिया करणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या व पाळीव श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरात सध्या 80 हजारांपेक्षा जास्त भटके श्वान आहेत. तर, 15 ते 20 हजार पाळीव श्वान आहेत. श्वानांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. श्वानांचे निर्बीजीकरण व संतती नियमन शस्त्रक्रिया करण्यासाठी पशू वैद्यकीय विभागाने आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. तरी, श्वान संतती नियंत्रणात आणण्यात पशू वैद्यकीय विभागाला अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी आता पुन्हा मोकाट, भटकी व बेवारस श्वानांची संतती नियमन शस्त्रक्रिया करण्याकरिता पुण्यातील मे. कॅनाईन कंट्रोल ऍण्ड केअर ट्रस्ट या संस्थेची नेमणूक केली आहे. संस्थेद्वारे मोफत श्वान संतती नियमन शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी संस्थेला लागणाऱ्या सोयी-सुविधा पालिकेला पुरवाव्या लागणार आहेत. त्यावर होणारा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. नेहरूनगर येथील डॉग पॉन्ड येथे त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे, सायन्टीफिक ईअर नॉचिंग, शस्त्रक्रिया पश्चात श्वानांची काळजी घेणे, रेबिज प्रतिबंधक लसीकरण, खावटी देणे, खाद्य देणे व डॉग पॉन्ड साफसफाईसाठी कर्मचारी नियुक्त करणे, शस्त्रक्रिया व तत्सम सर्व कामकाजाचे अद्ययावतीकरण करणे, डॉग स्कॉडसोबत समन्वय ठेवणे, पालिका प्रशासन व संस्थेमध्ये समन्वय ठेवण्यासाठी एक समन्वयक नेमणे, श्वान पकडणे व सोडण्याची प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे ही कामे संबंधित संस्थेमार्फत केली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेला सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर पालिकेला स्वतंत्र खर्च करावा लागणार आहे.
महापालिका संस्थेला देणार या सुविधा…
भटकी, मोकाट व बेवारस श्वानांवर संतती नियमन शस्त्रक्रिया व तत्सम कामे करण्यासाठी महापालिकेकडून सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित संस्थेने केली आहे. उपलब्ध डॉग पॉन्ड, एडब्ल्यूबीआय यांचे दिशानिर्देशानुसार प्रतिश्वान स्वतंत्र पिंजरा, शस्त्रक्रिया दालन, शस्त्रक्रियेपूर्वी तयारीकरिता श्वान ठेवण्याची जागा, स्वच्छतेकरिता नियुक्त कर्मचारी, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, भूमीगत गटार जोड, मृत श्वानांची विल्हेवाट, जैव सर्जिकल कचरा प्रतिदिन विल्हेवाट लावणे, डॉग पॉन्ड व परिसर नियमित निर्जंतुकीकरण करणे, 24 तास सुरक्षारक्षक पुरविणे, सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, श्वान पथकातील वाहनांचे इंधन, वाहनांची दुरुस्ती, डॉग कॅचर, वाहनचालक आदी सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.