वडगाव मावळ, दि. 16 (वार्ताहर) -वडगाव नगरपंचायत हद्दीतील पाणी योजना, रस्ते, लाईट, बंदिस्त गटारे, आरोग्य सेवा आणि शिक्षण या गोष्टींवर आमदार सुनिल शेळके यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच हेतूने वडगाव शहरवासीयांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेला 45 कोटी 5 लाख 96 हजार रूपयांची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.
जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या बंधाऱ्याजवळ जॅकवल बांधून हे पाणी लिफ्ट करून 300 मी.मी. व 200 मी.मी. व्यासाच्या वाहिनीतून हे पाणी वडगाव नजीकच्या शिंदे टेकडी व संस्कृती येथे फिल्टर प्लांट बसवून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी ही ड्रीम प्लानिंग योजना आहे. या योजनेचे तज्ज्ञांनी सर्व्हेक्षण केले असून जेथून पाणी उचलायचे आहे, त्या जांभूळ बंधाऱ्याची आणि जिथे पाणी शुद्धीकरण करून साठवायचे त्या संस्कृती आणि शिंदे टेकडी येथील प्लांटच्या जागेची पहाणी पाणी पुरवठा अभियंता यांनी केली असून त्याला हिरवा कंदील मिळाल्याने पुढील कार्यवाही वेगाने सुरू आहे.
आधुनिक पद्धतीने पुढील 30 वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून वडगावची पाणीपुरवठा योजना साकारणार आहे.
वडगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारा नागरी सुविधांवरचा अतिरिक्त भार यामुळे त्यांनी नगरपंचायतीला पूर्ण सहकार्य करून पुढच्या 30 वर्षांतील लोकसंख्या वाढीचा विचार करून नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत वडगाव नगरपंचायीकरिता दूरदर्शी पाणी पुरवठा योजना आखण्यात आली आहे. ही पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पुरेशा दाबाने सर्वांनाच स्वच्छ पाणी मिळणार आहे.
पुढील तीस वर्षांचे नियोजन
ही योजना आखताना 2051 च्या जनगणनेनुसार किती लोकसंख्या वडगाव शहराची असेल त्याचा विचार केलेला आहे. या महत्वकांक्षी योजनेला अंतिम स्वरूप तंत्रज्ञानाचा वापर करून ही पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी तसेच विद्युत पुरवठ्याबरोबर सौर उर्जेवर चालणारे पंप बसवण्याबाबतही आमदा शेळके आग्रही आहेत. तर, लवकर ही योजना कार्यान्वित करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करीत आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती राजेंद्र कुडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी दिली आहे.