वाई, (प्रतिनिधी) – थकीत कर्ज भरण्याचा करार करून, नेलेला अशोक लेलँड दहा टायर ट्रक वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुजरातमधील जामनगर येथून ताब्यात घेतला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, थकीत कर्ज भरण्याचा करार करून अब्दुल कादीर सय्यद याने अशोक लेलँड ट्रक (एमएच-11-एएल-7542) 21 सप्टेंबर 2020 रोजी तक्रारदाराकडून ताब्यात घेतला. मात्र, कर्जाचे दोन हप्ते भरल्यानंतर त्याने उर्वरित कर्ज न भरता, ट्रक परस्पर विकला.
याबाबत वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात हा ट्रक जामनगर (गुजरात) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जामनगर येथे ट्रकचा शोध घेऊन तो ताब्यात घेतला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, बी. आर. भरणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, हवालदार विजय शिर्के, अजित जाधव, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, शिंदे, प्रसाद दुदुस्कर, कोळी, नितीन कदम यांनी ही कारवाई केली.