मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

नगर – अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी राजकुमार गामाप्रसाद शर्मा याला जिल्हा न्यायाधीश सत्यनारायण नावंदकर यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्‍सो) आरोपीस दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जामखेड येथील आरोपी राजकुमार गामाप्रसाद शर्मा (वय-37. रा. जामखेड) याने फिर्यादीच्या घरी येऊन पीडित मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून तिचेवर शारीरिक अत्याचार केला.

सदरची बाब कोणास सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. पुन्हा आरोपी पीडितेच्या घरी येऊन त्याची पत्नी आजारी आहे. तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून पीडित मुलीस घेऊन गेला व पुन्हा तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. सदरची बाब पीडितेने तिचे वडिलांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुध्द पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत फिर्यादीवरून आरोपीस अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एम. सहारे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी सत्यनारायण आर. नावंदर यांचसमोर झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले. या पुराव्याच्या आधारे आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्‍सो) अंतर्गत दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीसाठी तिच्या वडिलांना देण्याचा आदेश देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.