पावसामुळे धुराडी पेटेना

जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर गळीतासाठी उसाचा प्रश्‍न

पुणे – विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. मात्र, वादळी पावसाने यंदा कारखान्यांचे धुराडे हे अजून तीन आठवडे पेटणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा गळीत हंगामावर ऊस टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. महापूर, दुष्काळ, रोगराईचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे राज्यातील कारखान्यांच्या गाळप हंगामाचे भवितव्य धोक्‍यात आले आहे.

निवडणूक होणाऱ्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पत्र देऊन सहकारी साखर कारखाने आणि संस्थांच्या प्राथमिक मतदार याद्या सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नवीन वर्षांत साखर पट्टा निवडणुकीने गजबजणार आहे. जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्‍यातील ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील सुमारे तेरा सहकारी साखर कारखाने आणि तीन ते चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत सहकार कारखानदारीसमोर खासगी कारखान्यांनी स्पर्धा केली आहे. त्यामुळे सहकाराखालोखाल खासगी कारखान्यांनी गाळपाचा टप्पा गाठला आहे. सहकार कारखानदारी सध्या मंदीच्या संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यात यंदा राज्यात ऊस टंचाईचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे गाळपावर परिणाम होणार आहेत.

विधानसभेची समीकरणे कारखानदारीला लागू ?
जिल्ह्यात अकरा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक येत्या वर्षात जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेची रंगीत तालीम या कारखान्यांसाठी झाली आहे. जिल्ह्यातील ऊस पट्टा असलेल्या बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यात राष्ट्रवादीने प्राबल्य निर्माण केले आहे. यातील अनेक कारखाने राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून राजकीय समीकरणे आणि बेरजेचे राजकारण करून एकहाती जिल्ह्यात वर्चस्व केले आहे. त्यामुळे विधानसभेची समीकरणे यावेळी कारखान्यांच्या निवडणुकीत लागू होणार आहे.

या कारखान्यांचे वाजणार बिगूल – 
2020 मध्ये नीरा-भीमा सहकार साखर कारखाना, इंदापूर, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर, संत तुकाराम साखर कारखाना मुळशी, माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती, सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना, बारामती, राजगड सहकारी साखर कारखाना, भोर, कर्मयोगी शंकररावजी कारखाना, इंदापूर, छत्रपती साखर कारखाना, इंदापूर, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखाना, शिरूर, भीमा सहकारी साखर कारखाना, दौंड, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, आंबेगाव या कारखान्यांचे निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे.

कारभाऱ्यांची दमछाक होणार – जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांची निवडणुका या मार्च ते जून 2020 या कालावधीत जाहीर होणार आहेत. त्यामुळे गाळप हंगाम संपल्यानंतर कारखान्यांच्या कारभाऱ्यांना निवडणुकांचे वेध लागणार आहे. त्यासाठी सभासदांना रास्त दर देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच यंदा ऊसाचे क्षेत्र घटल्यामुळे परजिल्ह्यातून उसाची पळवापळवी होणार आहे. त्यात तोडणी यंत्रणा आणि गाळपाचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ, अधिकाऱ्यांची दमछाक होणार आहे. यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने हे जेमतेम तीन ते चार महिनेच चालणार आहेत. त्यामुळे उसाचा प्रश्‍न ज्वलंत झाला आहे.

इच्छुकांच्या आकांक्षेला धुमारे – विधानसभा निवडणुकीत सहकारातील कारभाऱ्यांनी उत्तम भूमिका निभावली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील निकालावर झाला आहे. जिल्ह्यातील दौंड वगळता सर्वच जागेवर राष्ट्रवादीची टिकटिक सुरू झाली आहे. कारखान्यांच्या संचालकांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात विधानसभेसाठी प्रचार यंत्रणा राबविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयात हातभार लागला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गटात प्राबल्य असलेल्या संचालक आणि इच्छुकांच्या आकांक्षेला कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने धुमारे फुटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील हायकमांडला उमेदवारी देताना नाकीनऊ येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.