पुणे : अभिनेते सलमान खान यांच्या मुंबईतील घरासमोर हवेत गोळीबार करण्यात आल्यानंतर सतर्क झालेल्या पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि. १६) शहरातील रेकॉर्डवर असलेल्या पिस्तूल धाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली अन् त्यांना तंबी दिली.
एकीकडे पुणे पोलीस तंबी देण्याचे काम करत असताना एक गोळीबाराची घटना घडली. दुसऱ्या दिवशी बुधवार (दि१७) दुसरी गोळीबारीची घटना घडली. रहदारी असलेल्या जंगली महाराज रस्ता परिसर आणि हडपसरमधील शेवाळवाडीत या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात मोठी घटना घडली नाही.
परंतु, शेवाळवाडीत पायात गोळी लागल्याने एकजन गंभीर जखमी झाला आहे. पहिली घटना जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स येथे घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. खडकी) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. धीरज अरगडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स येथे ऑफिस आहे.
दुपारी ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास ऑफिसवर आले होते. काम झाल्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते वापस जाण्यासाठी त्यांच्या कारजवळ आले. पण, उन्हामुळे गरम झाल्याने ते एसी लावून तिथेच बसले.
त्याचवेळी दोघे पल्सरवरून हेल्मेट व आतून मास्क लावून तेथे आले. त्यांनी दुचाकी कारजवळ उभा करत पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने पिस्तूल बाहेर काढत तक्रारदारांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण, फायर झाले नाही.
पुन्हा त्याने पिस्तूल कॉक करून फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने फायर झाले नाही. तक्रारदारांनी आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोघे तेथून पसार झाले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
जंगली महाराज रस्त्यावरील गोळी झाडण्याच्या प्रयत्नाचा पोलीस मंगळवारी तपास करत असताना बुधवारी सकाळी-सकाळी हडपसरमधील शेवाळवाडीत भररस्त्यात गोळीबाराची घटना घडली. व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गोळीबारात जयवंत बापूराव खलाटे (वय ५३) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे (रा. शेवाळवाडी) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सुधीर शेडगे व जयवंत खलाटे यांनी लष्करातून सेवानिवृत्ती घेतली आहे. दोघेही सिक्युरिटी ठेकेदार आहेत. दरम्यान, या दोघांकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांच्यात बुधवारी सकाळी शेवाळवाडी येथील नंदनी ड्रीम सोसायटी येथे सिक्युरिटी गार्डच्या मुलांवरून वाद झाले.
वादातूनच सुधीर यांनी त्यांच्याकडील पिस्तूलातून जयवंत यांच्या पायावर गोळी झाडली. एक गोळी झाडल्यानंतर पुन्हा दुसरी गोळी झाडली. सुदैवाने ती मिस फायर झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
अचानक भल्या सकाळी भररस्त्यावर गोळीबार झाल्याने मात्र, परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुधीर शेडगे यांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत