दुबई – भारतीय संघाचा अनुभवी स्विंग गोलंदाजीचा स्पेशालिस्ट भूवनेश्वर कुमार व अष्टपैलु हार्दिक पंड्या यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील हायव्होल्टेज लढतीत भारताने पाकिस्तानचा डाव 19.5 षटकांत सर्वबाद 147 धावांवर रोखला.
Four wickets from @BhuviOfficial and three from @hardikpandya7 as Pakistan are all out for 147 in 19.5 overs.#TeamIndia chase underway.
LIVE – https://t.co/o3hJ6VNfwF #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/V2ftsLBGSa
— BCCI (@BCCI) August 28, 2022
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवताना पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांवर दडपण राखले. त्यांचा स्टार फलंदाज बाबर आझम याला डावातील तिसऱ्याच षटकात भूवनेश्वरने बाद केले व त्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यांचे फलंदाज हात मोकळे सोडून आक्रमक फटकेबाजी करु शकले नाही. त्यामानाने सलामीवीर महंमद रिझवानने थोडी चमक दाखवली. त्याने 42 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावताना 43 धावांची खेळी केली. मात्र, तो अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला.
मधल्या फळीत इफ्तेकार अहमदने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर भरवशाचे खुशदील शहा व शादाब खानही अपयशी ठरले व पंड्याच्या उसळत्या तर भुवनेश्वरच्या स्विंग चेंडूवर बाद झाले. तळात हॅरिस राऊफ व शहानवाज दहानी यांनी फटकेबाजी करत संघाला 19.5 षटकांत सर्वबाद 147 अशी समाधानकारक मजल मारुन दिली. राऊफ 2 चौकारांसह 13 धावांवर नाबाद राहिला तर, शहानवाजने 2 षटकारांसह 16 धावा केल्या.
भारताकडून भुवनेश्वरकुमारने सर्वाधिक 4 गडी बाद केले. हार्दीक पंड्याने 3 तर, अर्शदीप सिंगने 2 गडी बाद केले. आवेश खानने 1 बळी घेतला.
पंड्यासमोर उडाली भंबेरी
या सामन्याला कलाटणी मिळाली ती हार्दीक पंड्याच्या गोलंदाजीमुळे. त्याने भुवनेश्वरकुमारला सुरेख साथ देत पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्याचे फसवे उसळते चेंडू पाकिस्तानच्या फलंदाजांना उमगलेच नाहीत व त्यांनी अनावश्यक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट बहाल केल्या.
कोहलीचा शंभरावा सामना
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली याने या सामन्यासह आपल्या टी-20 कारकीर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना साजरा केला. क्रिकेटच्या तीनही प्रकारात शंभर सामने खेळणारा कोहली भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. तर न्यूझीलंडच्या रॉस टेलरनंतरचा जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज ठरला. या सामन्यापूर्वी कोहलीचा खास सत्कार कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडूंनी कोहलीला शुभेच्छा देत केला.
संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान – 19.5 षटकांत सर्वबाद 147 धावा. (महंमद रिझवान 43, इफ्तेकार अहमद 28, हॅरिस राऊफ नाबाद 13, शहानवाज दहानी 16, भुवनेश्वर कुमार 4-26, हार्दीक पंड्या 3-25, अर्शदीप सिंग 2-33, आवेश खान 1-19).