नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या (सोमवार) होणार आहे. अधिवेशनावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आप सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यावरून सत्तारूढ आप आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी सीबीआयने छापा टाकला. तेव्हापासून आप आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र बनला आहे. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आपने भाजपला घेरणारे काही दावे करून राजकीय सनसनाटी निर्माण केली.
दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भाजपने 40 आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आपने केला. अर्थात, भाजपचा तो डाव अयशस्वी ठरल्याचा दावाही आपकडून करण्यात आला. आता भाजपला शह देण्यासाठी केजरीवाल सरकार विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सज्ज झाले आहे. दिल्ली विधानसभेचे एकूण संख्याबळ 70 इतके आहे. आपचे 62, तर भाजपचे 8 आमदार आहेत. (Kejriwal govt ready to move confidence motion; Out of 70, AAP has 62 MLAs, with BJP has 8 MLAs)