भिडे पुलावर चारचाकी वाहनांना बंदी; वाहतूक कोंडीतून सुटका होण्याऐवजी भर

“पिक अवर्स’मध्ये काम सुरू केल्याने रस्ता जाम

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या बाबा भिडे पुलावर चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी गुरुवारी महापालिकेकडून पुलाच्या दोन्ही बाजूस बोलार्ड बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, काम रहदारीच्या वेळी सुरू केल्याने वाहतूक कोंडीतून सुटका होण्याऐवजी भर दुपारी त्यामध्ये भर पडली.

संभाजी पुलाहून पेठांमध्ये येण्याचे अंतर वाचविण्यासाठी अनेक चारचाकी वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात. मात्र, या “शॉर्टकट’मुळे पेठांमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. पर्यायाने याचा फटका दुचाकी चालकांना बसत आहे.

भिडे पुलावर चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली होती. या नियमाचा फलक देखील लावण्यात आला होता. मात्र, दुपारच्या वेळामध्ये शिस्तीचे पालन न करणाऱ्या पुणेकरांच्या चारचाकींची गर्दी होत होती. पर्यायाने या पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त होते.

या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिकेकडून भिडे पुलावर “बोलार्ड’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार गुरुवारी हे काम हाती घेण्यात आले. परंतु, मुळातच रहदारी असणाऱ्या भिडे पुलावर रहदारीच्या वेळात हे काम करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भिडे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.