एलआयसीच्या कॉल्समुळे पुणेकर हैराण

ब्लॉक केलेले नंबर बदलून ग्राहकांना सातत्याने कॉल्स्‌

पुणे – पुण्यातील ग्राहकांना सातत्याने येत असलेल्या एलआयसीच्या अनावश्‍यक मार्केटिंग कॉल्स विरोधात वातावरण तापलेले आहे. टेलिफोन ग्राहकांना सर्वसाधारणपणे “त्रास देऊ नका’ अर्थात “डु नॉट डिस्टर्ब’ (डीएनडी सेवा) या सदरांतर्गत अनावश्‍यक असे मार्केटिंगचे कॉल्स रोखण्याची सुविधा असते. त्यासाठी प्रत्येक मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीचा एक विशिष्ट फोन नंबरही असतो. त्यावर एसएमएस पाठवून असे कॉल्स/संदेश थांबवता येतात. तरीही अनेक कंपन्या मग ब्लॉक केलेले नंबर्स सातत्याने बदलून ग्राहकांना एसएमएस अथवा थेट किंवा रेकॉर्डेड कॉल्सच्या माध्यमातून संपर्क साधतच राहतात. त्याच पद्धतीने केल्या जाणाऱ्या जीवन बीमा निगमच्या सततच्या कॉल्सनी पुणेकर हैराण झाले आहेत.

अनावश्‍यक कॉल्स टाळण्यासाठी
– “स्टार्ट डीएनडी’ असा संदेश 1909 या राष्ट्रीय क्रमांकावर पाठवावा.
– ग्राहकाने असे कॉल्स न करण्यासाठी आपले नाव नोंदले नसले, तरीही अशा कंपन्यांना सकाळी 8 पूर्वी आणि रात्री 9 नंतर असे कॉल्स करता येणार नाहीत.
– प्रत्येक फोनसेवा पुरवणाऱ्या कंपनीने “डु नॉट डिस्टर्ब’ (डीएनडी सेवा) या सेवेसाठीचे क्रमांक जाहीर करणे अनिवार्य आहे.
– यासाठी सर्व फोनसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे राष्ट्रीय “डु नॉट डिस्टर्ब’ रजिस्टर तयार करून त्यानुसार काळजी घेतली जात आहे ना, यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटीने (ट्राय) लक्ष देणे अपेक्षित आहे.
– अनावश्‍यक कॉल करताना, कॉलरने त्याचे नाव, पद, पत्ता आणि कार्यालयाचा पत्ता सांगणे आवश्‍यक आहे.
– ग्राहकाने परवानगी दिलेली नसेल, तर कोणत्याही प्रकारचा थेट अथवा ध्वनिमुद्रित कॉल, ऍटोमेटिक कॉल करण्याची – – – कोणत्याही कंपनीला परवानगी नाही. त्यासाठी ग्राहक मंचात व्यक्‍तिगत अथवा सामूहिक तक्रार केल्यास ग्राहकांना नुकसानभरपाई मागण्याची तरतूद आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा…
राज्य ग्राहक न्यायमंचातील कायदेतज्ज्ञ आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. मृणालिनी वारुंजीकर यांनी “प्रभात’ला दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या ग्राहकाने एखाद्या कंपनीची सेवा अथवा वस्तू घेतली आणि त्यात काही चूक गफलत, दर्जाविषयी तडजोड आढळली, तर (“गिव्ह ऍण्ड टेक’ पॉलिसीनुसार) असे दावे ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत येतात. एलआयसीसारखी संस्था असे रेकॉर्डेड कॉल्स करत असेल, असे वाटत नाही. शिवाय असे कॉल ज्यांना येत आहेत, ते एलआयसीचे ग्राहक असतीलच असे नाही. त्यामुळे असे कॉल्स रेकॉर्ड करून त्याची पोलीस केस केली गेली पाहिजे. म्हणून ज्या क्रमांकांवरून असे कॉल्स येत आहेत, ते क्रमांक घेऊन, कॉल रेकॉर्डिंगच्या पुराव्यासह तक्रार करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. या दूरसंचार माध्यमाचा गैरवापर कोणी समाजकंटक करत असेल, असे मानायला जागा आहे. त्यामुळे याविषयीच्या तक्रारी माहिती तंत्रज्ञान कायदा-2000 अंतर्गत नोंदता येतील, असे वाटते.

नागरिकांना फोन करून योजनांची माहिती देणे, हे कंपन्यांचे काम असले; तरी वारंवार करण्यात येणाऱ्या फोन कॉल्सबद्दल कंपन्यांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. एकाच नागरिकाने नकार देऊनही संबंधिताला वारंवार फोन करणे योग्य नाही. कंपन्यांकडे विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार असे वर्गीकरण असणारी माहिती असल्यास संबंधितांच्या वेळांचा विचार करणे आवश्‍यक आहे. काही नंबर ब्लॉक करता येत नाहीत, अशावेळी फोन उचलण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. फोन उचलेपर्यंत कंपनीकडून प्रयत्न करण्यात येतात. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
– लीना घारपुरे, व्यावसायिक


नागरिकांना फोन करणे हे त्यांचे काम आहे. पण त्याची वारंवारता पाहता नागरिकांना मनस्तापच सहन करावा लागतो. एकाच कंपनीचे दिवसाला 4 वेळा फोन करणे योग्य वाटत नाही. खूपवेळा आपण कामात असतो, गाडीवर असतो. विद्यार्थी अभ्यासात असतात. काही नागरिक काळजीमध्ये सुद्धा असू शकतात. अशावेळी नकळत राग फोनवर व्यक्‍त केला जातो. त्यामुळे कंपन्यांनी नागरिकांच्या फोनचे “रेकॉर्ड’ ठेवले पाहिजे. “नाही’ म्हणणाऱ्या नागरिकांना वारंवार फोन केले जाणार नाहीत, याची काळजी कंपनीने घेणे आवश्‍यक आहे.
– राधिका खांदवे, विद्यार्थिनी


“विमा’ हा विषय आग्रहाचा आहे. मात्र, कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या आक्रमक मार्केटिंगमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्‍तीला आपल्या गरजा आणि आर्थिक परिस्थिती कशी समजणार. त्यामुळे नागरिकांना योग्य व्यक्‍तीशी प्रत्यक्ष सल्लामसलत करणे आवश्‍यक आहे. अनेकदा “एलआयसी’चे नाव वापरून अन्य कंपन्या ग्राहकांना फोन करून त्रास देतात.

– प्राजक्‍ता देशपांडे, विमा सल्लागार


अनेक नागरिकांनी वारंवार येणारे हे नंबर “एलआयसी हॅरेशमेंट’ असे सेव्ह केले आहेत. खासगी कंपन्यांकडून येणाऱ्या फोनमुळे “एलआयसी’बाबतचा नागरिकांचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. वेळी अवेळी येणाऱ्या या फोनला कंपनीने आळा घालणे आवश्‍यक आहे.

– अमृता दीक्षित, नागरिक


नकार देऊनसुद्धा विमा कंपन्यांचे प्रतिनिधी फोन करतात. नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. प्रत्येकवेळी वेगळ्या क्रमांकावरून कंपनीकडून फोन येतो. त्याचबरोबर मोबाइल नंबर असल्याने अनेकदा लक्षात येत नाही. वैयक्‍तिक आणि महत्त्वाचा फोन समजून घाईघाईत फोन घेतला जातो. दरवेळी वेगळा क्रमांक आणि वेगळी व्यक्‍ती फोन करून एकाच योजनेची माहिती देते. नाईलाजाने दरवेळी फोन उचलावे लागतात. पर्यायाने विनाकारण त्रासदेखील होतो.

– महेश आकोलकर, विद्यार्थी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.