मुंबई – सर्वसामान्य नागरिकांनाही लोकल प्रवासाची मुभा द्या, या मागणीसाठी लोकलमध्ये घुसून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार जणांना कोविड विषयक निर्बंधांचा भंग केल्याच्या कारणावरून आज अटक करण्यात आली.
त्यात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अन्य तीन जणांचा समावेश आहे.
सध्या मुंबईत मर्यादित स्वरूपात लोकलसेवा सुरू आहे. पण त्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची अनुमती आहे. सामान्य लोकांना लोकल सेवा उपलब्ध नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.
त्यामुळे सामान्य माणसांची व्यथा मांडण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. या कार्यकर्त्यांवर आयपीसी कलम 188 आणि आपत्ती निवारण कायदा तसेच कोविड नियंत्रण उपाययोजनांचा भंग इत्यादी कारणावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.