- शहरात 69 नवे करोनाबाधित
लोणावळा – लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला. शहरातील एकूण बधितांची संख्या 1008 इतकी झाली आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील भांगरवाडी, हनुमान टेकडी, सिद्धार्थनगर, गावठाण, भुशी, रामनगर आणि खंडाळा या विभागामध्ये दुसऱ्या टप्प्यातील कोविड 19 महासर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत 66 नवे रुग्ण आढळून आले आहे.
वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उल्लेखलेल्या विभागातील 60 वर्षांवरील नागरिकांची तसेच लक्षणे असलेल्या एकूण 397 जणांची कोविड चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये 328 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील एकूण चार स्वॅब सेंटरवर या चाचण्या घेण्यात आल्या. यात कोविड केअर सेंटर झालावाडी येथे 95 स्वॅब घेण्यात आले. त्यातील 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. खंडाळा माध्यमिक विद्यालय येथे 137 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
भुशी रामनगर येथे 100 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर संत ज्ञानेश्वर विद्यालय, भांगरवाडी येथे 65 जणांचे स्वॅब घेण्यात आले, त्यापैकी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी लॅबमधून प्राप्त झालेल्या अहवालात 7 जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आज मंगळवारी एकूण पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांची संख्या 73 इतकी झाली आहे.
या महासर्वेक्षण अभियानात नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि मुख्याधिकारी रवी पवार हे स्वतः ठिकठिकाणी फिरून लोकांना तपासणीसाठी आवाहन करीत होते. तर देविदास कडू, पूजा गायकवाड, रचना सिनकर, कल्पना आखाडे, मंदा सोनवणे या त्या त्या विभागातील नगरसेवक, नगरसेविका लोकांना स्वॅब सेंटरपर्यंत घेऊन येताना दिसत होते.
एक हजार पार झालेली ही संख्या प्रत्येक लोणावळेकर नागरिकाला काळजी करायला लावणारी आहे. एकप्रकारे नागरिकांनी यापुढे तरी सावध राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश देणारी आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यास जरून घराच्या बाहेर पडावे, मात्र मास्कचा आणि शक्य झाल्यास हॅन्डग्लोज वापर करावा, सोशल डिस्टनसिंगवर भर द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी रवी पवार यांनी लोणावळेकर नागरिकांना केले आहे.