माजी उपमहापौरांसह चार जणांना अटक

खूनी हल्ला प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल; दोन पिस्तूल जप्त

पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी दुपारी पिंपरी येथे तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यासह दोन्ही गटातील चार जणांना अटक केली आहे. तसेच दोन पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली आहेत.

हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी (वय ५१, रा. पिंपरी) व त्यांचे तीन कार्यकर्ते साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अभिनव सुरेंद्रकुमार सिंग (वय ३०, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डब्बू आसवानी हे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक असून यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिनव सिंग हे बबलू सोनकर यांच्या गाडीचे चालक आहेत. बबलू सोनकर यांचे सासरे गौतम चाबुकस्वार हे विधानसभा निवडणुकीकरिता पिंपरी मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

सोनकर व त्यांचे कार्यकर्ते पिंपरी परिसरात फिरत होते. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सोनकर हे आसवानी यांच्या घराजवळून जात होते. त्यावेळी आसवानी व त्यांच्या साथीदारांनी सोनकर यांची मोटार अडवली. कार्यकर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभरव आणि फिर्यादी यांना रस्त्यात अडवून लाकडी बांबू, सिमेंट गट्टू यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर बाबर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

तर डब्बू आसवानी यांनीही परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबलू सोनकर (वय ४०, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) जितू मंगतानी (वय ३२), अरुण टाक (वय ४०), दीपक टाक (वय ३८), लच्छू बुलाणी (वय ५५), मोहित बुलाणी (वय ३०),? अनिल पारछा (वय ३५, सर्व रा. पिंपरी) तसेच बबलू सोनकर यांचे तीन बॉडीगार्ड व इतर साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी बबलू सोनकर, जितू मंगतानी आणि लच्छू बुलाणी यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी आरोपी हे बेकायदा जमाव जमवून फिर्यादी आसवानी यांच्या घराजवळ आले. त्यावेळी आरोपी अरुण टाक, दीपक टाक यांनी आसवानी यांना धरले. “बबलू इसको खलास कर दे,” असे म्हणाले.

सोनकर यांनी आसवानी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील पिस्तुल आसवानी यांच्या डोक्याला लावली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी जितू मंगतानी यांनी त्याच्याकडील पिस्तूल कार्यकर्त्यांना दाखवून कोणी मध्ये पडल्यास एकेकाला खल्लास करीन, असे मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. आसवानी यांना जबरदस्तीने मोटारीत बसवण्याचा प्रयत्न केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे आणि इनोव्हा मोटार जप्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.