पुणे (प्रतिनिधी): वारजेतील डुक्कर खिंड परिसरात दुचाकीतून पेट्रोल चोरी केल्यामुळे एकाला जबर मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या चौघांना वारजे पोलिसांनी जेरबंद केले आहे.
श्रीकांत दत्तोबा सोनवणे (वय ३८, रा. म्हाडा वसाहत, वारजे), निलेश सुरेश गायकवाड (वय ३६, रा. मारुती मंदिर, दत्तवाडी), बबन बाळासाहेब ठाकर (वय ३८, रा. एनडीए रोड, शिवणे) आणि गौतम वामन शिंदे (वय ३४, रा. समर्थ सोसायटी, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रशांत अच्युतराव ढाकणे (वय ३५ ,रा. गुरुकृपा वॉशिंग सेंटर, वारजे, मुळ बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय ऐदाळे (वय 38) यानी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पानटपरीवर काम करत होता त्याची एक महिन्यापूर्वीच संजयशी मैत्री झाली होती. पानटपरीशेजारी असलेल्या एका वाॅशिंग सेंटरवर एकाने दुचाकी उभी केली होती. त्यावेळी प्रशांत दुचाकीतून पेट्रोल चोरी करत होता. त्यावेळी दुचाकी चालक त्याठिकाणी मोटारीतून साथीदारांसोबत आला. त्यांनी प्रशांतला पेट्रोल चोरी करताना पाहीले. त्यामुळे चौघांनी त्याला बेदम मारहाण केल्याने प्रशांतचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळाताच वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम, गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे.