पुणे : अमेरिकेतील ग्लोबल चेंबर या जागतिक स्तरावरील संस्थेच्या ‘चेअर ऑफ द युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री पार्टनरशिप प्रोग्राम’ या पदावर पुण्यातील सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची नियुक्ती झाली आहे. शिक्षण व औद्योगिक क्षेत्रातील प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचा मोठा अनुभव, सखोल ज्ञान आणि समाजाभिमुख काम करण्याची त्यांची वृत्ती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व उद्योग क्षेत्राला जोडत ५२५ महानगरांत विस्तारलेल्या जागतिक स्तरावरील नामवंत संस्थेच्या चेअर पदावर नियुक्त होणारे प्रा. डॉ. संजय चोरडिया पहिले भारतीय व्यक्ती आहेत. सुर्यदत्त परिवारासाठी ही अभिमानाची बाब असून, सर्वांतर्फे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे अभिनंदन करण्यात आले.
जगभरातील ५२५ शहरी विभागांत विस्तारलेल्या या संस्थेत उच्च पदस्थ, सीईओ आणि नेतृत्व करणार्या मान्यवरांचा समावेश आहे. या शहरात कंपन्यांना प्रगती व शाश्वत व्यवसाय वृद्धीसाठी मदत करण्याचे काम ही संस्था करते. काही निवडक संस्थांसोबत सहयोग करत व्यवसाय कोठूनही कोठेही वाढवणे, जगभरातील कंपन्या, गुंतवणूकदार आणि व्यवसाय सेवा प्रदात्यांना यशस्वी होण्यास मदत करणे हे संस्थेचे ध्येय आहे. ग्लोबल चेंबरचे संस्थापक आणि सीईओ डग ब्रहन्के यांनी २०१४ मध्ये अमेरिकेत मुख्यालय असलेल्या संस्थेची स्थापना केली. पाच खंडातील १९५ देशांत आणि ५२५ महानगरांत चेंबरचे कार्यालये आहेत.
प्रा. डॉ. संजय चोरडिया २०२१ पासून ग्लोबल चेंबरच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. या मंडळामध्ये व्यावसायिक तज्ज्ञ असून, कंपन्यांना महानगरांत आणि सीमापार व्यापार वाढवण्यासाठी, तसेच शैक्षणिक संस्थांना उद्योगांशी जोडून विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या अनेक संधींचे मार्गदर्शन केले जाते. सल्लागार मंडळ सदस्य म्हणून, प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी शिक्षण, उद्योग, नवोपक्रम आणि संशोधन, स्टार्टअप या क्षेत्रात विविध ऑनलाइन परिषदांद्वारे मार्गदर्शन, ज्ञानाची देवाणघेवाण करून मोठे योगदान दिले आहे. त्यांचे हे विस्तृत योगदान लक्षात घेऊन चेंबरच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची विद्यापीठ-उद्योग सहयोग उपक्रमाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. डग ब्रहन्के यांच्या वतीने सेसार ट्रबॅन्को यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “जागतिक स्तरावरील कार्य, विश्वासार्हता आणि उद्दिष्ट्ये याचे मुल्यांकन होऊन निवडक संस्था किंवा कंपन्यांना ग्लोबल चेंबरचे सदस्यत्व मिळते. अशा या नामवंत संस्थेचे २०२१ पासून सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला सदस्यत्व मिळाल्याचा अभिमान वाटतो. या सदस्यत्वामुळे ‘सुर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांना भारतातील, तसेच परदेशातील कंपन्यांनी जोडून घेण्याची संधी मिळणार आहे. त्यातून व्यवसाय प्रकल्प, विद्यार्थ्यांचे प्रकल्प, इंटर्नशीप आणि इतर गोष्टींसाठी हे सदस्यत्व उपयुक्त ठरणार आहे. चेंबरच्या सर्व केंद्रांना, कार्यालयांमध्ये शिक्षणासंबंधी सर्व उपक्रमांवर देखरेख करणार आहे. विद्यार्थी, तरुण, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि इतर भागधारकांना संबोधित करून विविध विषयांवरील माझ्याकडील ज्ञान देणार आहे. तसेच, या नियुक्तीचा फायदा ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये ट्विनिंग प्रोग्राम्स, ग्लोबल इंटर्नशिप्स, स्टार्ट-अप्सना त्यांच्या वाढीसाठी पाठिंबा आणि जागतिक विस्तारासाठी संधी मिळण्यासाठी होईल.”
शिक्षण, उद्योग क्षेत्राचा अनुभव
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना उद्योग क्षेत्राचा (फिरोदिया एंटरप्राइज) २० वर्षांहून, तर शिक्षण क्षेत्राचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. प्रा. डॉ. संजय चोरडिया १०० हुन अधिक विविध चेंबर ऑफ कॉमर्सचे पॅट्रोन व सदस्य आहेत. दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, टेलिफोन अडवायझरी कमिटी सदस्य, उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक विकास विभागाचे सदस्य आदी शासकीय संस्थांवरही त्यांनी काम केले आहे. दरवर्षी आयोजिल्या जाणाऱ्या कुलगुरूंच्या वार्षिक परिषदेत सहभागी होतात, मार्गदर्शन करतात. जगभरातील विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहित करण्याचे काम प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले आहे. या कार्यासाठी त्यांना १०० हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. २०० पेक्षा अधिक पेटंट प्रकाशित असून, दोन महत्वपूर्ण संशोधन केले आहेत. अनेक उपक्रमांची नोंद विविध बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.