जळगाव – भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री गिरीज महाजन यांना जळगाव येथील पक्ष कार्यालयात एका भाजप कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री जळगाव येथील भाजप कार्यालयात घडली.
शिवीगाळ करणाऱ्या कार्यकर्त्याने यावेळी दगडफेक केल्याचीही माहिती आहे. एका वृत्तसंकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीनंतर गिरीश महाजन पदाधिकाऱ्यांसह कार्यालयातून बाहेर पडत असतानाच एका कार्यकर्त्याने महाजन यांना शिवीगाळ सुरु केली. त्याने हातात दगड घेऊन तो एका कारवर भिरकावला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. असं असलं तरी याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
तो कार्यकर्ता भाजपचा नाहीच
दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत नगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे. हल्ला करणारा व्यक्ती भाजप कार्यकर्ता नसून तो मनोरुग्ण व मद्यपी असल्याचं त्यांनी सांगितलंय.