पटना – बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्टेजवर भाषण करताना अचानक स्टेज कोसळल्याची घटना मुझफ्फरपूरच्या मिनापूर विधानसभा मतदारसंघात घडली आहे. या घटनेत जन अधिकारी पार्टीचे नेते राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुझफ्फरपूरच्या मानापूर विधानसभा मतदार संघात पप्पू यादव आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सभेत भाषण करत होते. यावेळी स्टेजवर जास्त जण एकत्र आल्याने स्टेज कोसळले. या दुर्घटनेत अनेक कार्यकर्त्यांसह पप्पू यादव यांनाही दुखापत झाली आहे.
#WATCH: Stage collapses at Jan Adhikar Party leader Pappu Yadav's campaign rally in Muzaffarpur's Minapur Assembly Constituency.#BiharElections2020 pic.twitter.com/pZIfEINAm1
— ANI (@ANI) October 31, 2020
बिहारमधील निवडणुकीच्या सभेदरम्यान स्टेजवरील वजन जास्त झाल्याने स्टेज कोसळल्याची ही चौथी घटना घडली आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पप्पू यादव भाषण करत असताना स्टेज तुटल्याने खाली पडल्याचे दिसत आहे.
दरम्यान, 15 ऑक्टोबर रोजी जनता दल (युनायटेड) नेता चंद्रिका राय यांच्या सारण जिल्ह्यात निवडणूक रॅलीमध्ये गर्दीमुळे स्टेज कोसळले होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. राय यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेच सोनपुर विधानसभा मतदार संघता ही घटना घडली होती.
तसेच 29 ऑक्टोबर रोजी काॅंग्रेसचे उमेदवार मशकूर अहमद उस्मानी यांचे स्टेज कोसळले होते. ते दरभंगा येथे सभेला संबोधित करत होते.