मुंबई – विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेला भाजपकडून नेहमी हिंदूत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून लक्ष केलं जातं. या पार्श्वभूमिवर भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी पोंक्षे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विधान परिषदेवर 12 आमदारांना नियुक्त करण्यासाठी राज्यपाल कठोर नियम लावणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यपाल ग्राह्य धरतील अशाच व्यक्तींची नावं पाठवण्याचा विचार सर्व पक्ष करत आहेत. अभिनेता शरद पोंक्षे राज्यपालांच्या नियमांच्या चौकटीत बसणारे आहेत, असे बोलले जाते.
पोंक्षे हे हिंदूत्ववादी आहेत, तसेच सावरकारवादीही आहेत. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेकडून पोंक्षे यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते आहे. भाजपाकडून हिंदूत्व आणि सावरकर यांच्यावरून शिवसेनेला नेहमी टार्गेट केलं जातं. त्यामुळे पोंक्षेंचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.
यासंदर्भात अद्याप मला विचारणा झाली नाही, अशी प्रतिक्रिया एका खासगी वृतवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना शरद पोंक्षे यांनी दिली आहे.
शरद पोंक्षे यांच्या उमेदवारीला आरपीआयचा विरोध-
अस्पृश्यतानिवारणात फुले, आंबेडककरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
शिवसेना वेगळा पक्ष आहे. त्यांना त्यांचे उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. पण आम्ही आमचे उमेदवार खूप विचार करून दिले आहेत, अशी प्रतिक्रिया उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. तर शरद पोंक्षे यांच्यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.