पणजी – गोव्यातील माजी मंत्री महादेव नाईक यांनी भाजपला रामराम ठोकून आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. ती घडामोड पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपसाठी हादरा मानली जात आहे.
दिल्लीत शुक्रवारी झालेल्या सोहळ्यात नाईक यांनी आपचे सदस्यत्व स्वीकारले. त्यावेळी सत्येंद्र जैन, आतिषी हे आपचे नेते उपस्थित होते. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर नाईक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सध्या गोव्यात आप हाच एकमेव जनताकेंद्रित पक्ष आहे.
करोना संकटावेळी आपने गोव्यातील जनतेला विविध प्रकारे मदत केली. त्यावेळी भाजप कुठे होता, असा सवाल नाईक यांनी केला. गोव्यातील आगामी निवडणुकीत आप बाजी मारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गोवा विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची जय्यत तयारी आपने केली आहे. अशात नाईक यांचा प्रवेश त्या पक्षाचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे. आप देशातील विविध राज्यांत विस्तारण्याची आकांक्षा बाळगून आहे. त्यादृष्टीने त्या पक्षाने गोव्यावर लक्ष केंद्रित केले आहे.