मुंबई – देशातील परकीय चलन साठा 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 306 दशलक्ष डॉलर्सने घसरून 601.057 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे, रिझर्व्ह बॅंकेने परकीय चलन मालमत्तेच्या मूल्यातही तीव्र घट नोंदवली आहे.
सलग दोन आठवड्यांच्या वाढीनंतर परकीय चलन साठ्यात ही घट झाली आहे. 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात 3.854 अब्ज डॉलर्स आणि मागील आठवड्यात 4.23 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. याच आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 74 दशलक्ष डॉलर्सने घसरून ते 40.843 अब्ज डॉलर्स इतके झाले.
मागील दोन आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य वाढले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारताच्या स्पेशल ड्रॉइंग राइट्सचे मूल्य 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 28 दशलक्ष डॉलर्सने घसरून 18.410 अब्ज डॉलर्स झाले आहे, असे आरबीआयच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.