मुंबई – अमेरिकेच्या व्याज दरवाढीमुळे शेअर बाजारातून गुंतवणूक परत जात असतानाच भारताला निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन मोजावे लागत असल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात घट होत आहे.15 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 311 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 603 अब्ज डॉलरवर गेला आहे. काही महिन्यापूर्वी भारताकडील परकीय चलन साठा 640 अब्ज डॉलरपर्यंत वाढला होता.
मात्र त्यानंतर हळूहळू घट होऊ लागली आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा दोन अब्ज डॉलरने कमी झाला होता. सध्याच्या अवस्थेतही भारताकडे 600 अब्ज डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे. हा साठा भारताच्या 13 महिन्याच्या आयातीकरिता पुरेसा आहे.
त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात भारताला चिंता करण्याची फारशी गरज नसल्याचे समजले जाते. मात्र जर युद्ध रेंगाळत गेले तर आगामी काळात भारतासमोर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण अमेरिकेने अगोदरच पाव टक्के व्याजदर वाढ केली आहे आणि पुढील एक वर्षांमध्ये किमान एक टक्का व्याजदर वाढ केली जाणार आहे.अशा अवस्थेत भारतीय शेअर आणि रोखे बाजारातील गुंतवणूक वेगाने परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.