मुंबई – गेल्या काही दिवसांमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू केली आहे. मात्र तरीही भारताकडील परकीय चलन साठा कमी होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार 22 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने कमी होऊन 571 अब्ज डॉलर झाला आहे. मात्र त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये हा साठा कितीतरी वेगाने कमी होत होता. आता साठा कमी होण्याची प्रक्रिया मंदावली असल्याचे दिसून आले.
22 जुलै नंतर भारतामध्ये परकीय चलनाचा ओघ वाढला आहे. त्यामुळे यानंतरच्या आठवड्याची आकडेवारी अधिक समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 22 जुलैपर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री वाढली होती. मात्र आता ही विक्री कमी होऊ लागली आहे.
अमेरिकेची व्याजदर वाढ आणि युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. त्याचबरोबर भारताला अनेक वस्तूंची आयात महागात पडत होती. त्यामुळे भारताला जास्त प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागत होते. त्यामुळे भारतीय परकीय चलन साठ्यावर परिणाम झाला होता. हा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने काही उपाययोजना केल्या आहेत. भारतातील कंपन्यांना परदेशी बॅंकांकडून घ्यावयाच्या कर्जाच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
परदेशातील गुंतवणूकदारांना भारतीय रोखे खरेदी करण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. त्याचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम होत असून भारतातून परत जात असलेल्या परकीय गुंतवणुकीत घट होत असल्याचे दिसून येत आहे.आता अमेरिकेने मवाळ पत धोरण जाहीर केल्यामुळे आगामी काळामध्ये रुपयाच्या तुलनेत डॉलर जास्त वधारण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत भारतीय रुपयाचे मूल्य स्थिर राहण्यास मदत होऊ शकतो. गेल्या तीन दिवसात भारतीय रुपयाच्या मूल्यांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे.