बेल्हे -जुन्नर तालुक्यातील जम्बो द्राक्षांना परदेशात चांगला बाजारभाव मिळत असूनही यावर्षी अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दोनशे टन द्राक्षांची निर्यात केली आहे. या निर्यातीतून तालुक्यातील 810 निर्यातदार शेतकऱ्यांच्या पदरात 2 कोटी 80 लाख रुपयांचे परकीय चलन पडले आहे. अवकाळीतून वाचलेल्या द्राक्षांना देशातंर्गत बाजारपेठेत जेमतेमच दर मिळत आहे.
जुन्नर तालुक्यात कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिक डोह, पिंपळगाव जोगे, वडज, चिल्हेवाडी ही पाच धरणे असल्याने तालुक्याचा पूर्णपणे कायापालट झालेला आहे. तालुक्यात कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणावरून कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगे धरणावरून एक कालवा, असे दोन कालवे बांधण्यात आले आहेत. कालव्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी पालेभाज्या, ऊस, केळीबरोबर द्राक्षे, आंबा, डाळींब पिके घेतली आहे. जम्बो, शरद सीडलेस, तास गणेश, थॉमसन जातीच्या द्राक्षांना परदेशात मागणी आहे. चांगला बाजारभाव मिळत आहे.
सध्या राजुरी, बोरी बुद्रुक, ओझर, नारायणगाव परिसरात द्राक्ष तोडणी सुरू आहे. परंतु यावर्षी अवकाळी व बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. अवकाळीने द्राक्षांचे पिकाचे नुकसान झालेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी औषधे फवारणी करून काही प्रमाणात हे पीक वाचवले आहे. शेतकऱ्यांच्या जम्बो द्राक्षांना परदेशात चांगला बाजारभाव मिळत आहे.
जम्बो द्राक्षांच्या प्रतवारीनुसार एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये बाजारभाव मिळत आहे. दुय्यम दर्जाच्या द्राक्षांना साठ ते सत्तर रूपये बाजारभाव मिळत आहे. ही द्राक्षे श्नीलंका, चीन, रशिया, जर्मनी, युरोप, युके आदी देशात जात आहेत. जुन्नर तालुक्यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दोनशे टन द्राक्ष परदेशात निर्यात केलेली आहेत.
कळंब जम्बो, शरद, सुधाकर या द्राक्षाच्या जातीचे उत्पादन यावर्षीच्या खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात घटले आहे. फुलोरा अवस्थेत पीक असताना मोठ्या प्रमाणात फुलोरा गळ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात यावर्षी मोठी घट होणार आहे.
– संतोष बापू भोर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, भोरवाडी.
जम्बो जातीच्या द्राक्षांचे उत्पादन राज्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक निघत आहे. जुन्नर तालुक्यात द्राक्ष लागवडीसाठी सुमारे साडेचार हजार ते पाच हजार एकर क्षेत्रावर लागवडी झालेल्या आहेत. गेल्या वर्षी 70 एकर क्षेत्रावर लागवडी झालेल्या होत्या. यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी उत्पादन कमी निघणार आहे. सध्या हवामानात अनेकवेळा बदल झाल्याने तसेच कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यांचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात ज्या छाटणी होत होती. ती पुढे ऑक्टोबरमध्ये झाली. त्यामुळे फळधारणाचा कालावधी उशीर झाला. त्यामुळे जानेवारी महिन्यात कमी उत्पादन निघत आहे.
– हिरामण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर.
कृषी विभागाकडे तालुक्यात 810 निर्यातदार शेतकऱ्यांनी
1 हजार 250 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांची नोंदणी केलेली आहे. वातावरणातील कमी जास्त होणाऱ्या थंडीमुळे फळात साखर तयार होणे व फुगवणे यांचा फटका बसून यावर परिणाम झाला आहे. भविष्यात जम्बो द्राक्षांना चांगला बाजारभाव मिळणार आहे.
– बापूराव रोकडे, कृषी अधिकारी, जुन्नर.