नवी दिल्ली – देशात सलग दुसऱ्या दिवशी 6 हजारहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे एकाच दिवसातील करोनाबाधितांच्या वाढीचा नवा उच्चांक नोंदला गेला.
शुक्रवार सकाळपासून 24 तासांत देशातील करोनाबाधितांमध्ये 6 हजार 654 या संख्येची भर पडली. त्याआधी देशात एकाच दिवसात सर्वांधिक 6 हजार 88 बाधित आढळले होते. तो उच्चांक शनिवारी मागे पडला. करोना संसर्गामुळे देशभरात आणखी 137 रुग्ण दगावले. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 3 हजार 700 वर गेली आहे.
मागील काही दिवसांत करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. तशातही बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासादायी ठरत आहे. देशात आतापर्यंत 52 हजारहून अधिक बाधित करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 41 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
देशातील सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे. त्या राज्यात 15 हजारहून अधिक बाधित आढळले आहेत. गुजरातमधील बाधितांच्या संख्येने 13 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशाची राजधानी दिल्लीतील बाधितांची संख्या 13 हजारांच्या घरात पोहोचली आहे.