सातारा – जिल्ह्यातील 46 जणांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याला करोना विषाणूने मोठा हादरा दिला. या 46 रुग्णांमध्ये पाटण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 20 रुग्ण असल्याने पाटण तालुका आता “हॉट स्पॉट’ बनला आहे. त्याखालोखाल सातारा तालुक्यातील सहा आणि फलटण तालुक्यात चार रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 247 झाली असून यापैकी 127 जण उपचार घेत आहेत. 114 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर सहा रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात मंगळवारी 28, बुधवारी 15 व गुरूवारी 20 असे तीन दिवसातच 63 कोरनागस्त वाढल्याने चिंता वाढली होती. मात्र, शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून पॉझिटिव्ह रुग्णांबाबत काहीच माहिती न मिळाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी सकाळी 40 चा आकडा आल्याने जिल्ह्याला पुन्हा हादरा बसला. त्यामुळे शुक्रवार वगळता चार दिवसांतच 103 रुग्ण सापडल्याने शनिवारी सकाळी पुन्हा जोरदार धक्का दिला. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संध्याकाळी आणखी नवे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या 6 जणांचा अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी शनिवारी संध्याकाळी सात वाजता दिली. यामध्ये कराड तालुक्यातील म्हासोली येथील 15 वर्षांची मुलगी व 71 वर्षांचा पुरूष, ढेबेवाडी फाटा येथील 18 वर्षांची मुलगी, 23 वर्षीय युवक, 44 वर्षांची 1 महिला, गलमेवाडी ता. पाटण येथील 24 वर्षांची युवती अशा एकूण सहा जणांचे अहवाल करोना बाधित आले आहेत.
सकाळच्या सत्रातील एक रुग्ण लोधवडे (ता. माण) येथील असून मृत्यू झाल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसांच्या तपासणीनंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. शनिवारी सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय वयाच्या दोन महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला पाटण तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गमेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला भुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष असे एकूण 19 जण करोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
इतर रुग्णांमध्ये कराड तालुक्यात म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला व जळगाव येथून आलेला उंब्रजचा 58 वर्षीय पुरुष असे दोन, कोरेगाव तालुक्यात मुंबई येथून आलेली होलेवाडी येथील 40 वर्षीय महिला व मुंबई येथून आलेला पिंपोडे येथील 55 वर्षीय पुरुष असे दोन, माण तालुक्यातील शिरताव (ता. माण) येथील 25 वर्षीय व 28 वर्षीय असे दोन पुरुष, लोधवडे येथील 67 वर्षीय पुरुष (मृत) असे तीन, फलटणमधील कोळकी येथील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 34 व 60 वर्षीय अशा दोन महिला, 9 वर्षाची दोन बालके असे चौघे जण, सातारा तालुक्यातील जकातवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरीतील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी येथील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, शेंद्रे येथील 55 वर्षीय पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे.
खंडाळा तालुक्यातील घाटदरे येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला तिघे, वाई तालुक्यात मुंबई येथून आलेला वासोली येथील 47 वर्षीय पुरुष करोनाबाधित झाले आहेत. मलकापूर (ता. कराड) येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसांच्या तपासणीनंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
240 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
पुण्यातील एन. सी. सी. एस. यांनी 190 जणांचे अहवाल व कृष्णा मेडिकल कॉलेजने 36 अशा एकूण 226 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
139 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 20, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 44, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 54, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 2 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 8 अशा एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.