मेलबर्न – ऑस्ट्रेलियामध्ये सिनेटर म्हणून निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या एका बॅरिस्टरनी पद स्वीकारताना घेण्याची शपथ भगवत गीतेवर हात ठेवून घेतली आहे. वरुण घोष असे या ३८ वर्षीय हिंदू बॅरिस्टरचे नाव असून ते लेबर पार्टीचे सदस्य आहेत. सिनेट सदस्य पॅट्रीक डडसन यांनी आजारपणाच्या कारणास्तव निवृत्ती घेतल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये घोष निवडून आले.
सिनेटर म्हणून पदग्रहण करण्याच्या समारंभामध्ये घोष यांनी भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली, असे ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. वोंग यांनी घोष यांचे सिनेटर म्हणून सभागृहामध्ये स्वागत देखील केले आहे. घोष हे आपल्या समुदायाचे आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाचे योग्य प्रतिनिधीत्व करतील, असा विश्वासही वोंग यांनी व्यक्त केला.
वरुण घोष यांचे पालक १९८० च्या दशकात भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि डॉक्टर म्हणून काम करू लागले. वरुण घोष वयाच्या १७ व्या वर्षी पर्थमधील मजूर पक्षात सामील झाले.ते फ्रान्सिस बर्ट चेंबर्समध्ये बॅरिस्टर आहेत आणि त्यांनी व्यावसायिक आणि प्रशासकीय कायदा, तसेच औद्योगिक संबंध आणि रोजगार कायद्यात काम केले आहे.
घोष यांनी कायदा आणि कला या विषयातील पदवी मिळवली आहे. त्यांनी गिल्ड कौन्सिलमध्ये अध्यक्ष आणि गिल्ड सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर शिक्षणही घेतले आहे.