मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःला पण डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर काही वेळात अभिषेक यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शूटरनेही आत्महत्या केली.
दहिसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मॉरिश नावाच्या व्यक्तीने गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गोळ्या घालणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीच्या कार्यालयाची तोडफोड केली. घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.