टॅंकरच्या मागणीसाठी कुळधरणला महिलांचा ठिय्या

कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या महिला आघाडीचा पुढाकार; ग्रामविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लेखी आश्‍वासनाने आंदोलन स्थगित
संतप्त महिलांनी ग्रामविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. आंदोलनाबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने, वर्षाराणी सुपेकर यांनी गटविकास अधिकारी मुकुंद पाटील यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी भागात टॅंकरद्वारे तसेच 20 एप्रिलपासून नळपाणीपुरवठाद्वारे नियमित पाणीपुरवठा देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले.

कर्जत  – कर्जत तालुक्‍यातील कुळधरण येथे टॅंकरच्या मागणीसाठी कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या वर्षाराणी सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. चिंचेचे लवन भागात पाण्याची भीषण टंचाई असताना, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने, निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार महिलांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता ग्रामपंचायतीत येऊन ठिय्या दिला.

कार्यालयात उपस्थित असलेल्या ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत तापकीर यांना संतप्त महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वर्षाराणी सुपेकर यांनी चिंचेचे लवण भागात टॅंकरद्वारे नियमित पुरवठा होत नसल्याने, महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे उपलब्ध झालेल्या टॅंकरच्या पाणीपुरवठ्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यापुढे पाणी वाटपात दुजाभाव व दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

भगवान सुपेकर यांनी शेततळ्यांमध्ये पाणी न सोडता टाक्‍यांमध्ये पाणी भरून देण्याची जोरदार मागणी केली. बंडू सुपेकर यांनी नळ पाणीपुरवठ्याचे पाणी उपलब्ध का होत नाही? याचा जाब विचारला. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी तापकीर यांनी ठेकेदाराकडून काम पूर्ण न झाल्याने पाणी पुरविण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. बंडू सुपेकर यांनी तात्काळ ठेकेदार यांना संपर्क करून माहिती विचारली असता, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. त्यावर ग्रामविकास अधिकारी यांची बोलतीच बंद झाली. तारामती सुपेकर, कल्पना सुपेकर, सावित्री सुपेकर यांनी ग्रामविकास अधिकारी तापकीर यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला.

आंदोलनात निर्मला सुपेकर, सावित्री सुपेकर, संगिता राठोड, अनिता गवई, पुष्पा सुपेकर, मंदाकिनी जगताप, कल्पना सुपेकर, तारा सुपेकर, सुरेखा सुपेकर, नंदा सुपेकर, मनीषा सुपेकर, राजूबाई सुपेकर, शांताबाई सुपेकर, सविता सुपेकर, संगीता सुपेकर, कीर्ती सुपेकर, जाईबाई पवार आदी महिला तसेच ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक कुमार जगताप, बंडू सुपेकर, बंटीराजे जगताप, राजू पाटील तसेच कुमार गजरमल, दत्तू गजरमल, महादेव गजरमल, गोरक्ष सुपेकर, दादा सुपेकर, सुनील सुपेकर, नितीन सुपेकर आदींनी सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.