विमानतळावर फोटो काढणे पडणार महागात

नियम मोडल्यास भरावा लागणार तीन हजार रुपयांचा दंड

पुणे – लोहगाव विमानतळाच्या टर्मिनन्स आणि संरक्षित परिसरात फोटो काढणे आता महागात पडणार आहे. शे पाचशे नव्हे तर तब्बल तीन हजार रुपये दंड संबंधितांकडून आकारण्यात येणार आहे. दंडाचा नियम जुनाच असला तरी आता त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

लोहगाव विमानतळ हा नागरी वाहतुकीशिवाय लष्कराच्या लढाऊ विमानांचा तळही आहे. त्यामुळे तो अतिसंवेदनशील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानतळावर फोटो काढण्याला सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर विमानतळ परिसरात “फोटो काढण्यास मनाई आहे’ या सूचनेकडे विमातळावर येणारे 60 टक्‍के प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचे “एअरलाइन्स ऑपरेशन्स कमिटी’च्या ते निदर्शनाला आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कमिटीच्या सदस्यांनी बुधवारी विमानतळ परिसरात फोटोग्राफीला बंदी असल्याबाबत जनजागृती केली. तसेच, येत्या काळात यासाठी आणखी काही जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. परंतु, एवढे होऊनही नियमांचे न झाल्यास तीन हजार रुपये दंड आकारणे अपरिहार्य असल्याचे कमिटीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ड्राईव्हमध्ये विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींचाही सहभाग
गेल्या काही वर्षांत विमानप्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. वर्षाकाठी किमान 40 ते 50 लाख लोक प्रवास करतात. रोजचीच संख्या सुमारे 30 हजारांच्या आसपास असते. त्यामुळे चेकिंग झाल्यानंतर उरलेल्या वेळात फोटो, सेल्फी काढण्याचे प्रमाणही खूप आहे. फोटो काढल्याबद्दल तीन हजार रुपये दंड आकारण्याचा नियम जुनाच आहे. यापूर्वी त्याची फारशी अंमलबजावणी केली जात नव्हती. मात्र, आता वाढलेले प्रवासी आणि नियमभंगाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता, या दंडाची गंभीरपणे आकारणी केली जाणार आहे. तसेच, या ड्राईव्हमध्ये विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाणार असून, फोटो काढताना कोणी आढळल्यास ते एअरलाइन्स ऑपरेशन्स कमिटीच्या निदर्शनास आणून देणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.