सातारा -करोना संक्रमणाच्या पार्श्वूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गणेशोत्सव नियमावली बुधवारी जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळाची “श्रीं’ची मूर्ती चार फूट व घरगुती गणपती मूर्ती किमान दोन फूट असावी, असे बंधन घालण्यात आले आहे .
पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या नऊ दिवसावर येऊन ठेपला आहे. स्वागत व विसर्जन मिरवणुका टाळून अत्यंत साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची 19 कलमांची नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केली. शहरासह जिल्ह्यात 3200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून येत्या 22 तारखेपासून गणेशोत्सव सरू होत आहे.
या पारंपरिक उत्सवाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांची सूची जाहीर केली. त्यानुसार सार्वजनिक मंडळाची श्रींची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणे बंधनकारक आहे. मंडपाचे स्वरूप मर्यादित ठेऊन तेथे पाच जण राहतील. मांडवावर कोणतीही जाहिरात करू नये व मनोरंजनात्मक देखावे करण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
मंडळांनी आरोग्य मेळावे, रक्तदान शिबिरे सोशल डिस्टन्सिंग पाळून आयोजित करावी, कार्यकारिणीने तीन वेळा मांडव परिसर सॅनिटाईज करावा, अध्यक्षांनी आरोग्य सेतू ऍपचा वापर करावा, मंडळाला भेट देणाऱ्यांची पत्ता नाव माबाइले नंबर आदींची नोंद ठेवावी, घरगुती मूर्ती शाडूची असेल घरीच विसर्जन करावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री विसर्जन आरती पाच लोकांमध्ये मांडवात करून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करावी, वृध्द माणसे व लहान मुलांनी विसर्जन तळ्याकडे फिरकू नय, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय कंटेनमेंट झोनमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक, महाप्रसाद, नारळ, मिठाई, हार यांची दुकाने लावण्यास प्रतिबंध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.