नवी दिल्ली: राफेल लढाऊ पाच विमानांच्या पहिल्या तुकडीने आज फ्रान्समधून उड्डाण केले. ही विमाने हवाई दलाच्या अंबला येथील तळावर बुधवारी येतील, अशी अपेक्षा आहे.
भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीचा 59 हजार कोटी रुपयांचा करार केल्यानंतर चार वर्षांनी ही विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे हवाई दलाची मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. चीनबरोबर पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानांचे आगमन दिलासादायक मानले जात आहे.
भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ यांनी राफेलच्या उड्डाणापूर्वी हवाई दलाच्या पायलटांशी संवाद साधला. राफेल विमानांची ही तुकडी अंबाला हवाई तळावर बुधवारी उतरेल. त्यानंतर बुधवारी त्यांचा औपचारिकरित्या हवाई दलात समावेश करण्यात येईल. मात्र, त्याचा अधिकृत समारंभ ऑगस्टच्या मध्यात करण्यात येईल, असे हवाई दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
या विमानांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि विमानचालकांचे प्रशिक्षण भारताने यापूर्वीच पूर्ण केले आहे. राफेल विमानांची दुसरी तुकडी प. बंगालमधील हसीमारा हवाई तळावर उतरेल. या दोन तळांवर राफेल विमानांसाठी शेड, हॅंगर आणि देखभाल सुविधेसाठी हवाई दलाने 400 कोटी रुपये खर्च केले आहेत.
या 36 राफेल विमानांपैकी 30 ही लढाऊ विमाने आहेत तर सहा विमाने प्रशिक्षणासाठी आहेत. ती दोन आसनी असून त्यात लढाऊ विमानात असणाऱ्या बहुतांश सुविधा आहेत.
राफेलची ताकद
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष ताबा रेषेवर कारवाईला बळ यावे म्हणून हा ताफा पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात येईल.
हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता हे राफेल विमानांचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. स्कल्प क्षेपणास्त्र ही त्याची ताकद आहे. याशिवाय त्यात भारताने सुचवलेल्या अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
इस्रायली हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले, रडारची आगाऊ सूचना, 10 तासांचा फ्लाईट डाटा रेकॉर्डर, इन्फ्रा रेड ट्रेकिंग सिस्टिमचा त्यात समावेश आहे.