लोणी काळभोर – दोन वर्षात फ्लॅट देतो असे विश्वासात घेऊन समजुतीचा करारनामा करून 50 हजार रूपये रोख स्वरूपात व 2 लाख 50 हजार रूपयेधनादेशाच्या स्वरूपात असे एकूण 3 लाख रूपये घेऊन करारनाम्यामध्ये ठरल्याप्रमाणे बांधकाम सुरू न केल्याने दिलेले तीन लाख रूपये व्याजासहित मागितले असता या रकमेचे खोटे धनादेश देवून दिलेले पैसे तसेच ठरल्याप्रमाणे फ्लॅट न देता फसवणूक केल्याप्रकरणी एकावर उरुळी देवाची दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अमोल कांबळे (रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी विकास सुरेश सावंत (वय 39, रा. लक्ष्मीनगर, पुणे, मूळ रा. नऱ्हे, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, सावंत हे 2015 पासून प्लॅटच्या शोधात होते.
त्यावेळी त्यांचा मित्र कांबळेने सांगितले की उरूळी देवाची येथे सासऱ्यांची जमीन असून त्यावर बांधकाम करून 1 बीएचके फ्लॅट फेब्रुवारी 2017 मध्ये 12 लाख रूपयांत देतो, असे सांगून दि. 5 फेब्रुवारी 2015 रोजी फ्लॅट खरेदीसाठी समजुतीचा करारनामा केला.
करारनाम्यात त्यांनी 50 हजार रुपये रोख तर त्याचदिवशी 1 लाख 50 हजार रुपये धनादेशाद्वारे दिले होते. त्यानंतर एकूण 3 लाख रूपये कांबळे याला दिले होते. बाकीची रक्कम ही बांधकाम सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 7 हजार रूपयांप्रमाणे देण्याचे ठरले होते, तसे करारामध्ये नमूद होते.
मात्र, दोन वर्षांनंतरही बांधकाम झाले नाही. त्यामुळे सावंत यांनी तीन लाख रूपये व्याजासहित करारनाम्यामध्ये ठरल्याप्रमाणे परत मागितल्यानंतर कांबळेने दिलेले धनादेश वटले नसल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.