पुणे – स्वच्छ सर्वेक्षणात शहर पिछाडीवर पडले, शहरातील अस्वच्छता, ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या या सगळ्यावर महापालिका मुख्यसभा दणाणून सोडणाऱ्या आणि प्रशासनाला वेठीला धरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कचरा निर्मूलनासंदर्भातील उपक्रमांकडे मात्र पाठ फिरवली आहे. दि.28 डिसेंबर रोजी होणाऱ्या “प्लॉगेथॉन 2020′ या उपक्रमाच्या तयारीच्या बैठकीला उपस्थित राहणे नगरसेवकांना महत्त्वाचे वाटले नाही, त्यामुळे त्यांनी याकडे पाठ फिरवली.
प्रभाग समिती स्तरावर या बैठकीचे आयोजन केले होते. बहुतांश प्रभाग समिती या सत्ताधारी भाजपच्या ताब्यात आहेत. हेच नगरसेवक “प्लॉगेथॉन 2020′ च्या तयारीच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. पुणे महापालिका राष्ट्रीय पातळीवरील “स्वच्छ सर्वेक्षण अभियाना’मध्ये सहभागी झाली आहे. मागील वर्षी या अभियानामध्ये पुणे महापालिकेचा क्रमांक घसरल्यानंतर सर्वच स्तरांतून टीका झाली होती. याला महापालिका प्रशासनालाच जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे यंदा प्रशासनाने सुरुवातीपासून या अभियानासाठी मेहनत घ्यायला सुरूवात केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने 28 डिसेंबरला शहरातील 180 ठिकाणी आणि प्रमुख 45 रस्त्यांच्या परिसरात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याची तयारी करण्यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या स्थानिक प्रभाग समितीमध्ये शुक्रवारी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 15 प्रभाग समित्यांमध्ये सहायक आयुक्तांनी या बैठका घेतल्या. मात्र, बहुतांश प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवकांनी त्याकडे पाठ फिरवली. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये 8 ते 12 नगरसेवक आहेत. मात्र, तीन ते चारच नगरसेवक या बैठकांना उपस्थित होते. त्यातही सर्वाधिक 98 संख्याबळ असलेल्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अगदीच अल्प होती. काहींनी औपचारिकता म्हणून फक्त उपस्थिती दर्शवली. या बैठकीसाठी महापौर कार्यालय आणि अतिरिक्त आयुक्तांकडून प्रत्येक नगरसेवकाला लेखी पत्र आणि संपर्क क्रमांकावरून निरोप दिल्यानंतरही ही परिस्थिती होती.
असा आहे उपक्रम
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सेवक, मोकादम यांनीही यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने दि.28 डिसेंबरपासून “प्लॉगेथॉन 2020′ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत “मॉर्निंग वॉक’ असो अथवा रात्रीची शतपावली नागरिकांनी रस्त्याने जाताना प्लॅस्टिक अथवा कागदाचा कचरा गोळा करून जवळच असलेल्या डस्टबीनमध्ये टाकायचा. म्हणजे व्यायाम करताना किंवा जाता जाता स्वच्छता ही यामागची संकल्पना आहे.