पिंपरी – गेल्या काही दिवसात बांधकाम साहित्याच्या दरांमध्ये किमान 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचा मोठा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे घरांच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. स्टीलच्या दरातही गेल्या 10 महिन्यांत तब्बल 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यातच 1 एप्रिलपासून 1 टक्क्याने मेट्रो सेस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शहरात विविध भागांमध्ये सध्या मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. बांधकाम साहित्याच्या दरात सध्या 25 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. त्यातही सर्वाधिक वाढ ही स्टीलमध्ये आहे. स्टीलचे दर 10 महिन्यांपूर्वी 46 रुपये किलो इतके होते. सध्या हे दर 78 ते 80 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहे. म्हणजे स्टीलच्या दरात 70 टक्क्यांपेक्षा आधिक वाढ झाली आहे.
फ्लॅटच्या किंमतीत होऊ शकते 20 टक्के वाढ
फ्लॅटच्या दरात सध्या 5 टक्क्याने वाढ झाली आहे. डिझेल, पेट्रोलच्या किंमती वाढण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे. त्यामध्ये वाढ झाल्यास बांधकाम व्यावसायिकांच्या वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्याशिवाय, 1 एप्रिलपासून राज्यातील ज्या शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे, तिथे राज्य सरकार पुन्हा एकदा 1 टक्क्याने मेट्रो उपकर (सेस) लागू करण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 2017 पासून हा कर वसूल करीत आहे. मेट्रो सेसच्या नावाने घर खरेदीवर 1 टक्के मुद्रांक शुल्क आकारत आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने 1 एप्रिल 2020 पासून राज्य सरकारने पुढील 2 वर्षांसाठी मेट्रो उपकर मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा हा मेट्रो उपकर लागू झाल्यास त्याचा परिणाम घरांच्या किमती वाढण्यावर होणार आहे. फ्लॅटच्या किमती 15 ते 20 टक्क्याने वाढू शकतात, असा बांधकाम व्यावसायिकांचा अंदाज आहे.
बांधकाम साहित्याच्या दरात 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने फ्लॅटच्या दरात 3 ते 5 टक्क्याने वाढ झाली आहे. बांधकाम खर्चात झालेल्या वाढीमुळे बांधकाम व्यावसायिक “रेरा’कडे गृहप्रकल्पांसाठी मुदतवाढ मागत आहेत. 1 एप्रिलपासून प्रस्तावित असलेला मेट्रो उपकर काही काळासाठी लावू नये, अशी आम्ही राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. तसेच, केवळ सदनिकांसाठी मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
– शांतीलाल कटारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष, क्रेडाई