पुणे – करोना संपुष्टाच आल्यामुळे आता घरांची मागणी वाढू लागली आहे. दरम्यानच्या काळामध्ये महागाई वाढल्यामुळे घरासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील विविध शहरातील घरांच्या किमती वाढल्या आहेत.
पुण्यातील घरांच्या किमती या कालावधीत पाच टक्क्यांनी वाढल्या असल्याचे क्रेडाई या विकासाच्या संघटनेने केलेल्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संघटनेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की या तिमाहीत पुण्यातील घरांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढून साधारणपणे 7,681 रुपये प्रति वर्ग फूट या पातळीवर गेल्या आहेत. कोथरूड आणि बाणेर या पुण्यातील भागामध्ये घरांच्या किमती सर्वात जास्त म्हणजे नऊ ते दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घरांच्या किमती या तिमाहीत 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दिल्लीतील घरांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद या आठ शहरातील घरांच्या किमतीचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
आता घरांची मागणी करोनापूर्व पातळीवर गेल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अहमदाबाद शहरातील घरांच्या किमती 9% ने वाढून 5,927 रुपये वर्ग फूट व बंगळूर शहरातील घरांच्या किमती चार टक्क्यांनी वाढून 7,848 रुपये वर्ग फुट झाल्या आहेत.
चेन्नईतील घरांच्या किमती एक टक्क्यांने वाढून 7,129 रुपये वर्ग फूट झाल्या आहेत. हैदराबाद शहरातील घरांच्या किमती 8% वाढून 9,218 रुपये प्रति वर्ग फूट या पातळीवर गेल्या आहेत. या किमती कार्पेट एरियावर आधारित असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळामध्ये व्याजदरात वाढ झाली असली तरी बरेच विकसन घरे विकण्यासाठी ही व्याजदर वाढ स्वतःच्या अंगावर घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र एकूणच वातावरण सकारात्मक असल्यामुळे आगामी काळामध्ये नव्या घराच्या योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात उत्सवाच्या काळामध्ये विकसन घरांची विक्री आक्रमकपणे करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.